अंबाजोगाई दि.२३ – काळाची स्थित्यंतरे लक्षात घेऊन वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत. पत्रकारिता व साहित्यातून हे साध्य करता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले.
कै.त्र्यंबक आसरडोहकर स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार शुभम खाडेंना प्रदान झाला. शहरातील स्व.विलासराव देशमुख सभागृहात बुधवारी (दि.२२) प्रमुख अतिथी म्हणून आसाराम लोमटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे होते. समितीच्या रेखा शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. लोमटे यांनी पत्रकारितेतील बदल सांगून, नव्याने आलेल्या समाज माध्यमाचे स्वागत त्यांनी केले. नवीन तंत्रज्ञानाचा जन्म हा काळाने चांगली पावले टाकावीत यासाठीच असतात. आणि या बदलांचा व त्यानुसार झालेल्या आपल्या कामाचा दस्तावेज प्रत्येकाने केला पाहिजे. त्र्यंबक आसरडोहकर यांचे व्यक्तिमत्त्वही असेच होते. ग्रामीण साहित्यातून त्यांनी वेगळ्या वाटा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पत्रकारितेत जगण्याच्या संघर्षात पिचून गेलेल्या माणसांच्या बाजूने लिहिता आले पाहिजे, युवा पत्रकारांकडून त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. अशी भावना असल्याशिवाय बदल घडणार नाहीत, पत्रकारीता व साहित्यातून हे आले पाहिजे. आपल्या आयुष्यातील वाटा आपणाला निर्माण कराव्या लागतात. असे विचारही लोमटे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आसाराम लोमटे यांच्या हस्ते शुभम खाडे यांना आई -वडिलांच्या उपस्थितीत कै. त्र्यंबक आसरडोहकर स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, फेटा, स्मृती चिन्ह, रोख रक्कम असे होते. सत्काराला उत्तर देताना शुभम खाडेंनी आपल्या भावना व्यक्त करून आव्हानांना सामोरे जाण्याच्या वाटांवर मार्गक्रमण करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गोरख शेंद्रे यांनी केले. रोहिणी देशमुख व रेखा शितोळे यांनी परिचय दिला. किरण आसरडोहकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी डॉ.सिध्देश्वर बिराजदार, डॉ.कमलाकर कांबळे, डॉ.नवनाथ घुगे, संपादक परमेश्वर गित्ते, सुदर्शन रापतवार, बाल साहित्यिक गणपत व्यास, प्रसाद चिक्षे, अभिजीत जोंधळे, पुष्पा बगाडे, प्रा.अलका तडकडकर, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, धनंजय मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविधतेला सामोरे जा-अमर हबीब
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना अमर हबीब म्हणाले, पत्रकारितेत रोज नव्या गोष्टींना सामोरे जावे लागते. जगातील विविधतेला सामोरे गेले पाहिजे ही संधी पत्रकारितेत आहे. शेतकरी या महत्वाच्या घटकावर बोलताना, शेतकरी हा समाजाच्या रेल्वेचे इंजिन आहे. अन्नाची व्यवस्था करणार्या शेतकर्यांना कामगारांबरोबर समजू नका, तोच शेतकरी आज संकटात असल्याची चिंताही हबीब यांनी व्यक्त केली.