केज दि. २५ – तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शांताबाई तापडीया पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार ( दि.२५) उत्साहात संपन्न झाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्त्रीरोगतज्ञ डॉ.हेमा राऊत तसेच बाल प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील कानडी रोडवरील शांताबाई तापडीया इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रांगणावर दु.१२.०० वा. स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.हेमा राऊत तसेच श्रीमती शोभा लटपटे यांनी उपस्थित पालकांना बालकांचे संगोपन, संस्कार, आहार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय तापडिया, संस्थेचे स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष डी. डी. बनसोडे, प्रिन्सिपल स्वप्नील कडेकर यांचीही उपस्थिती होती.
सदरील स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गितांसह लोकगितांवर ठेका धरून मनमुराद आनंद देत पालकांची मने जिंकली. सुमारे तीन तास चाललेला कार्यक्रम पाहण्यासाठी शहरासह कानडी माळी, केवड, जानेगाव, उमरी, साळेगाव, सोनिजवळा, कुंबेफळ, ढाकेफळ तसेच इतरही गावातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.