(प्रतिनिधी: विनोद ढोबळे)
केज दि ७ – तालुक्यातील विडा येथे मागच्या दीडशे वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम राहिली आहे. गावच्या जावयाला धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवायचे, गावातून अगदी डीजेच्या तालावर मिरवणूक काढायची आणि विसर्जन स्थळी जावयाचा कपड्यांचा आहेर देऊन मान सन्मान करायचा अशी ही अनोखी परंपरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. आणि तीच परंपरा कायम राखण्यामध्ये विडेकर यावर्षीही यशस्वी झालेले आहेत.
मागच्या दीडशे वर्षांपूर्वी थट्टा मस्करी मधून एका जावयाला आनंदराव देशमुख यांनी गाढवावर बसवले आणि गावातून मिरवले. आणि याचेच रूपांतर पुन्हा परंपरेमध्ये झाले. ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही म्हणून गावातील नागरिकांनी दरवर्षी जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढायचे ठरवले. मात्र सदरील मिरवणुकीची धास्ती घेऊन धुलीवंदनाच्या अगोदरच चार दिवसांपासून संपूर्ण जावई भूमिगत होऊ लागले. मग जावयाचा शोध घ्यायचा तर कसा ? आणि यासाठी मग विड्यातील नागरिकांना जावई शोध मोहीम राबवावी लागते. आणि मागच्या दीडशे वर्षापासून ही परंपरा अशाच प्रकारे चालू असली तरी जावयाचा शोध घेण्यासाठी गावातील तरुणांना मात्र भटकावे लागत आहे. आणि यावर्षीचीही परंपरा कायम राखण्यासाठी जावई शोध सुरू झाला. मात्र जावई काही मिळत नसल्याने तरुणांनी हार मानली नाही.आणि धुलीवंदनाच्या दिवशीच पहाटे केज तालुक्यातीलच जवळबन येथील अविनाश हरिभाऊ करपे या जावयाला तरुणांनी झोपेतच पकडले आणि विड्याला घेऊन आले. अविनाश करपे हे युवराज पटाईत यांचे जावई आहेत आणि त्यांना विड्यामध्ये आणून धुलीवंदनाच्या आजच्या दिवशी गाढवावरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. गावातील तरुणाई बेधुंद होऊन डीजेच्या तालावर आणि जावयाच्या समोर थिरकू लागली आहे. आता अवघ्या काही वेळेमध्येच सदरील जावयाला विसर्जन स्थळी नेल्या जाईल आणि त्या ठिकाणी मिरवणुकीचे विसर्जन झाल्यानंतर जावयाला मनपसंत कपड्याचा आहेर दिला जातो आणि मनसोक्त जेवू खाऊ घालून मानसन्मान करून जावयाची त्यानंतरच सुटका केली जाणार आहे.