Site icon सक्रिय न्यूज

विद्यार्थी पालकांसह शिक्षकांना, महिलांना अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा…..!

विद्यार्थी पालकांसह शिक्षकांना, महिलांना अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा…..!
आज शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलावहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आहे. तर महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करण्याचीही घोषणा केली आहे.
कालच, महिला दिन साजरा करण्यात आला, राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली असून आणखीही कांही योजना महिलांसाठी घोषित करण्यात आल्या आहेत.
              तसेच या अर्थसंकल्पामध्ये शालेय विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा देण्यात आला असून पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सरसकट मुलांना मोफत गणवेश देण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पूर्वी काही विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची वाटप करण्यात येत होते. मात्र आता ही योजना सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षण सेवकांच्याही मानधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली असून यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधन सहा हजारावरून 16000 करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन आठ हजारावरून अठरा हजार असं वाढवण्यात आला आहे.तसेच उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 9000 वरून थेट 20000 रुपये असं वाढवण्यात आलं आहे.
         दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. कारण या सर्व सवलती बरोबरच शिष्यवृत्ती योजनेची मोठी वाढ करण्यात आल्याचेही यावेळी घोषित करण्यात आले.
शेअर करा
Exit mobile version