केज दि.१५- राज्यात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अंशतः पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी आहेत त्यांनी आता मोठ्या प्रमाणावर उठाव घेतला असून आता नाही तर कधीच नाही या अनुषंगाने अगदी पेटून उठलेले आहेत. राज्यभर निदर्शने होत आहेत, मोर्चा निघत आहे आणि सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केजमध्येही मोर्चा काढण्यात आला होता.
वास्तविक पाहता राज्य सरकारकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे जरी सांगितले गेले असले तरी मात्र आता अंशतः पेन्शन योजनेमध्ये असलेले कर्मचारी माघार घ्यायला तयार नाहीत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर निदर्शने होतच आहेत मात्र तालुकास्तरावर सुद्धा आता आंदोलने दिसू लागले आहेत. आणि याचाच भाग म्हणून आज केज मध्येही सर्वच अंशतः पेन्शनमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मग ते महसूल विभागाचे असतील शिक्षण विभागातील असतील किंवा इतर विभागात विभागातील असतील सर्वांनी मिळून आज केज मध्ये पेन्शन मंजूर करण्यासाठी मोर्चा काढला. यामध्ये सर्वच विभागातील सुमारे साडेचारशे ते पाचशे कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्य रस्त्याने काढलेला हा मोर्चा अगदी घोषणांनी दणाणून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा काढलेला मोर्चा त्यानंतर भवानी चौकापर्यंत जाऊन पुन्हा तहसीलमध्ये आला आणि तहसीलमध्ये आपल्या मागण्यांचे निवेदनन दिल्यानंतर सदरील मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.
त्यामुळे यापुढेही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जे आंदोलन उभारले गेलेले आहे ते अधिक तीव्र होत जाणार असेच दिसून येत आहे.