Site icon सक्रिय न्यूज

लाईनमनला मारहाण ; पोलीसांत गुन्हा दाखल…..! 

लाईनमनला मारहाण ; पोलीसांत गुन्हा दाखल…..! 
केज दि.२६ – कागदपत्रे व कोटेशनसाठी पैसे देत लगेच कनेक्शन जोडून दे म्हणत एकाने लाईनमनला शिवीगाळ करीत प्लास्टिक पाईपने मारहाण केल्याची घटना लाडेवडगाव ( ता. केज ) येथे शुक्रवारी ( दि.२४ ) दुपारी घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
          केज तालुक्यातील होळ येथील विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाईनमन पदावर ज्ञानेश्वर लक्ष्मण गडदे ( वय ३०, रा. चिचखंडी ता. अंबाजोगाई ) हे सप्टेंबर २०२० पासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे लाडेवडगाव हे गाव असून २४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता वीज बिलाच्या वसुलीसाठी या गावातील विलास मस्के यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. त्यांच्याकडे गावातील हनुमंत रघुनाथ शेप, प्रभाकर किसनराव केंद्रे हे दोघे आले. त्यावेळी लाईनमन ज्ञानेश्वर गडदे यांनी प्रभाकर केंद्रे यांना थकीत बिल भरण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी ५ हजार रुपये भरणा करतो म्हणाले. तेव्हा तुमच्याकडे ११ हजार रुपये थकबाकी आणि वस्तीवरील नागरिकांकडे थकबाकी असल्यावरून वस्तीचा विद्युत पुरवठा केल्याचे सांगून त्यांना वरिष्ठांशी बोलण्यास सांगितले. तेवढ्यात हनुमंत शेप याने नवीन लाईट कनेक्शन घ्यायचे सांगून त्यासाठी आधार कार्ड, सात बारा व ३ हजार रुपये देत आताच कनेक्शन जोडुन द्या, असे म्हणाला. त्यावरून सर्वांचे थकीत बील भरल्यास आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कनेक्शन जोडण्यात येईल, आता कोणाचेही कनेक्शन मला जोडता येत नाही. असे लाईनमन गडदे यांनी सांगून त्यांचे पैसे व कागदपत्रे परत केली. त्यानंतर चिडलेल्या हनुमंत शेप याने शिवीगाळ करीत प्लास्टिक पाईपने मारहाण केली. याची माहिती अभियंता अजय पांडे यांना देऊन नंतर लाईनमन ज्ञानेश्वर गडदे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून हनुमंत शेप याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून फौजदार विलास तुपारे हे तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version