Site icon सक्रिय न्यूज

महामंडळाच्या बसचे होतेय दररोज नुकसान……!

महामंडळाच्या बसचे होतेय दररोज नुकसान……!

केज दि.३१ – मागच्या कित्येक वर्षांपासून अहमदपूर ते अहमदनगर या राज्य रस्त्याचे काम सुरू आहे. अर्धवट राहिलेल्या कामामुळे कित्येक अपघात झालेले आहेत तर अनेक फुलांचे काम अद्यापही रखडलेले आहे. मात्र यामध्ये सर्वात जास्त हाल सुरू आहेत शहरातील रस्त्याचे. शहरामधून जाणारा हा रस्ता अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला आहे. नाली बांधकाम नाही, फुटपाथ नाही त्यामुळे कित्येक अडचणींचा सामना पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये आहे.

              अहमदपूर ते अहमदनगर हा राज्य रस्ता बांधणीसाठी एचपीएम कंपनीकडे दिला गेलेला आहे. मागचे कित्येक वर्षांपासून सदरील रस्त्याचे काम सुरू असून कुठल्याच ठिकाणी काम पूर्णत्वाला गेलेले नाही. बहुतांश ठिकाणी सरळ सरळ सिमेंट रस्त्याचे काम जरी झालेले असले तरी रस्ता बांधण्याचे काम तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही. अनेक ठिकाणी पुलांची कामे रखडलेली आहेत तर जिथे सदरील रस्ता हा शहरामधून जातो त्या ठिकाणी तर वेगवेगळ्या प्रकारची कामे करणे गरजेचे असते. मात्र दोन्ही बाजूने सिमेंट रस्ता झाला याचा अर्थ रस्ता पूर्ण झाला असा जो समज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे.
              शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम झाले पाहिजे, फुटपाथ झाला पाहिजे आणि वेगवेगळ्या अंतर्गत वसाहतीला राज्य रस्ता जिथे जोडल्या जातो त्याचेही काम पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र केज शहरातील उपजिल्हा रुग्णालय ते शिक्षक कॉलनी पर्यंत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत. बस स्थानक आहे. वेगवेगळी कार्यालय आहेत मात्र त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने पादचारी आणि वाहनधारकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरून इतर ठिकाणी जाणारे रस्ते आहेत अगदी त्याच वळणावर सिमेंट रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. बस स्थानकामधून बसेस ज्या मार्गाने स्थानकात येतात आणि जिथून बाहेर येतात त्या ठिकाणी तर अतिशय मोठमोठे खड्डे आहेत. आणि त्यामुळे बस स्थानकामध्ये जाताना आणि बाहेर येताना कित्येकदा बसचा मागचा भाग हा घासल्या जात आहे. आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा तर धोक्यात आलेली आहे, त्यापेक्षाही महामंडळाचे सतत बस घासत असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रस्त्याचे काम चालू असताना इतर ठिकाणाला अडथळा निर्माण होऊ नये आणि त्याची तात्पुरती का होईना निगा राखावी याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रस्ता बांधणी कंपनीकडे असते. मात्र पूर्णपणे या कंपनीचे दुर्लक्ष आहे. शहरातून जाणारा रस्ता तात्काळ पूर्ण व्हावा यासाठी कित्येकदा आंदोलने झाली. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या एचपीएम कंपनीला याचे कसल्याही प्रकारचे सोयरसुतक नाही. शहरांतर्गत रस्ता अर्धवट स्थितीमध्ये असल्यामुळे वाहतुकीची ही मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊ लागलेली आहे. मोठ्या प्रमाणावर दुतर्फा दुचाकी स्वार आणि इतरही मोठी वाहने अगदी रस्त्यावरच उभी राहिल्याने रस्त्याचे रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडी दिवसातून कित्येक वेळा होत आहे.
           दरम्यान, हे सर्व असताना कंपनीचे तर याकडे दुर्लक्ष झालेलेच आहे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहत नसतील ? असा प्रश्नही नागरिकांना पडलेला आहे.
शेअर करा
Exit mobile version