Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात माजी सैनिकांची भव्य रॅली…..!

केज शहरात माजी सैनिकांची भव्य रॅली…..!
केज दि.३ – माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्या केंद्रशासनाने तात्काळ मंजूर कराव्यात यासाठी दिल्ली येथे जंतर-मंतर वर गेली दोन महिने सुरू असलेल्या माजी सैनिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज केज शहरात संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर भव्य रॅली काढून निवेदन दिले. या रॅलीमध्ये केज तालुक्यातील दोनशेहून अधिक माजी सैनिकांनी सहभाग नोंदवला.
             सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या रॅलीला सुरुवात झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली ही रॅली मंगळवार पेठ, बसस्थानक, श्री छत्रपती शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालय प्रांगणात पोहोंचली. या संपूर्ण मार्गावरून माजी सैनिकांनी “भारत माता की जय, जय जवान-जय किसान, भारतीय सैनिकांचा विजय असो, हम सब एक है, शाहिद वीर जवानांचा विजय असो, आणि सैनिकांच्या मागण्या मान्य करा” या राष्ट्रीय व मागण्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. रॅलीमध्ये अग्रभागी सन्मानाने राष्ट्रध्वज धरण्यात आला होता.  सैनिकांचा उत्साह व जोश पाहून नागिरकांनी रॅलीचे स्वागत केले.
तहसील समोर संघटनेच्या वतीने शासनाला इशारा देण्यात आला.
               माजी सैनिक हे राष्ट्रप्रेमी व समाजप्रेमी आहेत व तीतकेच शिस्तप्रिय आहेत. मात्र याचा अर्थ त्यांच्यावर व्यक्तिगत, समाजावर व देशावर झालेला अन्याय ते कदापि सहन करणार नाहीत. तसेच यापुढे केज शहरातील कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात माजी सैनिकांना अपमानास्पद वागणूक अथवा त्याचे हक्काचे व अधिकृत काम करण्यास कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी टाळाटाळ केल्यास किंवा कसूर केल्यास केज तालुका संघर्ष सैनिक संघटना याचा जाब विचारेल असा इशारा संघटनेचे सचिव हनुमंत भोसले यांनी दिला.  संघटनेचे उपाध्यक्ष राम प्रभू राऊत यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा तात्काळ विचार करावा नसता संघटना लवकरच तीव्र आंदोलन छेडेल अशा इशारा दिला. यावेळी शेख इलाही यांनीही प्रशासनाने सैनिकांच्या समस्यांची दखल घ्यावी अशी मागणी केली. रोटरीचे माजी अध्यक्ष महेश जाजू यांनीही सैनिकांच्या प्रश्नावर शासनाने लक्ष देण्याबद्दल सांगितले. यानंतर केज तालुका तहसील प्रशासनाच्या वतीने अव्वल कारकून गोकुळ नन्नवरे व जे. डी. पठाण यांनी निवेदन स्वीकारून योग्य त्या कार्यवाहीसाठी वरिष्ठ शासनपातळीवर पाठवण्याचे माजी सैनिकांना आश्वासन दिले.
शेअर करा
Exit mobile version