Site icon सक्रिय न्यूज

केजच्या कलाकाराची डिझाईन चोरली…..!

केजच्या कलाकाराची डिझाईन चोरली…..!
केज दि.६ – जेंव्हा एखादा कलाकार अपार मेहनत घेत, आपला जीव ओतून एखादी अप्रतिम कलाकृती जगासमोर सादर करतो आणि तीच कलाकृती जेव्हा कोणी कलाद्रोही (कला चोर )स्वतःची निर्मिती भासवून बाजारपेठेत विकतो तेव्हा त्या खऱ्या कलाकाराला त्यापेक्षा दुसरे कोणते मोठे  दुःख नसते. असाच काहीसा प्रकार घडलाय केज मधील कलाकार सुरेश बोर्डे यांच्या कलाकृती बाबत.
             सुरेश बोर्डे हे केज (जि. बीड ) येथील कलाकार आहेत.ते मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा कला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी एस. एच. बी आर्ट क्रिएशन या नावाने एक स्टुडिओ केज मध्ये स्थापन केला आहे. त्यांचे कला उत्पादन आणि मूर्ती ॲमेझॉन ,गुगल या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वर सुद्धा आहेत. गुगलवर एस.एच. बी. आर्ट क्रिएशन नावाने रजिस्टर आहे. त्यांनी मागील 2021 मध्ये येरमाळा येथील श्री. येडेश्वरी देवीची मूर्ती ( 4 इंच) साकारली , त्यावर पाठीमागे त्यांच्या स्टुडिओचा लोगो असून , कॉपीराईट केलेली अशी ही मूर्ती तिचे 500 नग विक्रीसाठी तेथील एका व्यावसायिकाला 2022 मध्ये दिले पण काही कलाद्रोहींनी ( कला चोरांनी )  त्यांची ही मूर्ती घेऊन त्यावर साचा ( मोल्ड ) टाकून  एकाने जशास तशी मूर्ती बनवली आणि दुसऱ्या एका व्यक्तीने त्यात थोडे बदल करून कमी किमतीमध्ये विक्रीला सुरुवात केली.
                यावर्षीच्या श्री येडाई देवीच्या जत्रेमध्ये ती मूर्ती आणली आहे असे प्रत्यक्ष जाऊन सुरेश बोर्डे यांनी पाहिले. परंतु आता  व्यापाऱ्यावर आणि मूर्ती बनवणाऱ्या कारागिरास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल आणि पूर्ण मूर्तीचा संग्रह जप्त केला जाईल व त्याचा दंड म्हणून रुपये १ लाख ते १० लाख मोजावे लागतील त्यामुळे मूर्तीचे पूर्ण उत्पादन थांबवावे आणि यापुढेही ते कधीच करू नये.
         दरम्यान, कलाद्रोही लोकांकडून काही खरेदी करण्या अगोदर त्या कलाकृतीचा खरा कलाकार किंवा स्टुडिओ कोणता आहे हे जाणून नंतर व्यवहार करावा. याआधी कोणीही उठायचे आणि कलाकृती चोरून त्याचा धंदा मांडायचा पण आता असे चालणार नाही. आता कलाकार जागृत झाला आहे,  कुठलीही कलाकृती ही  ” डिझाईन रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत ” संरक्षित करता येते. त्यामुळे कालाद्रोही लोकांना कांही करायचे तर स्वतः काहीतरी निर्माण करून त्याचा व्यवसाय करा.असे आवाहन सुरेश बोर्डे यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version