पुणे दि.७ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा (Board exam) वर्णनात्मक आणि वैकल्पीक अशी वर्षातून दोनदा (twice in a year) होण्याची शक्यता आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीने बारावी परीक्षेसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत. जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाला तर बारावी परीक्षेचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्या फ्रेमवर्कनुसार सेमिस्टर पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील. त्याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना देण्याची मर्यादा नसेल. विद्यार्थ्याला बारावी बोर्ड परीक्षा देताना १६ विविध अभ्यासक्रमांचे कोर्स उपलब्ध होतील आणि त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम (optional subject) निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील. यासाठी अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेबरोबर पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला जाईल, असे देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
यांसदर्भात राज्य मंडळातील एक अधिकारी म्हणाले, बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा घ्यायची असेल तर तसा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरणाला तयार करावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाला राज्य शासनाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षा नेमकी कशी घ्यायची यासंदर्भात राज्य शासन धोरण ठरवून राज्य मंडळाला तसे आदेश देईल. नवीन शैक्षणिक धोरणात बारावीच्या दोन परीक्षा घेत असताना एक परीक्षा एमसीक्यू बेस्ड आणि दुसरी परीक्षा वर्णनात्मक पध्दतीने घेण्यासंदर्भात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, नविन शैक्षणिक धोरणातील सर्वच घटकांची अंमलबजावणी करणे कोणत्याही राज्य सरकारवर बंधनकारक नाही. त्यामुळे बारावीच्या वर्षातून दोन परीक्षांच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची का नाही, याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे.