परभणी दि.३० – काल (दि.२९) दहावीचा निकाल घोषित झाला अन चर्चा सुरू झाली ती कुणाला किती टक्केवारी आली याची. अनेकांनी १००% टक्के घेतल्याने त्यांचे कौतुक सुरू झाले. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती माजलगाव तालुक्यातील उमरीच्या धनंजय ची..! कारण त्याने दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात 35 -35 गुण घेत एक अनोखा विक्रम केला अन सर्वांच्या नजरेत भरला. 100% वाल्यांपेक्षा भावही खाऊन गेला. मात्र त्याची चर्चा बंद होत नाही तोच आणखी एक पठ्ठया असेच प्रत्येक विषयात 35 -35 गुण घेऊन उत्तीर्ण झालेला समोर आला असून त्याचे नाव आहे दिपक बापूराव डुकरे….!
दिपक हा मूळचा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या धनगर टाकळी गावच्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. मात्र शिक्षणासाठी तो परभणीत राहतो. परभणी शहरातील पारडेश्वर विद्यालयाच्या दिपकने K154216 या परीक्षा क्रमांकाने दहावीची परीक्षा देत सर्वच्या सर्व विषयात अगदी तंतोतंत 35 – 35 गुण घेत एक अनोखा विक्रम नावावर करून घेतला. त्याच्या या मोजून मापून केलेल्या कामगिरीमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर आणखी एक असाच विक्रमविर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे. असो काही का असेना…. नाव तर झाले…..!
दरम्यान परभणी शहरातील पारडेश्वर विद्यालयातून या वर्षीच्या निकालात विशेष प्राविण्यात 34 प्रथम श्रेणीत 34 तर द्वितीय श्रेणीत 19 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अर्जुन तायनाथ 96.20 विनायक नवले 95.20 तर महानंदा भुमरे 95 % गुण घेत गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, मुख्याध्यापक जी.डी. शिंदे यांच्यासह सर्वश्री पवार, गायकवाड, सोमटकर, चव्हाण, वसेकर, आडगावकर, झोरे, गोडगे तसेच अजय देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.