मुंबई दि.२० – महाराष्ट्र भूषण पुरस्कारा वेळी 15 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावधतेने पावले टाकत आहे. राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसात ही तीव्रता अधिक वाढणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता 21 एप्रिलपासून राज्य शिक्षणमंडळाच्या सर्व शाळांना सुटटी जाहीर करण्यात आल्याची घोषणा केली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. या उष्माघाताचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिलपासून सुटटी जाहीर करण्यात येत आहे. शाळा सुरू होण्याची तारीख या आधीच जाहीर केली आहे. राज्यात 15 जून आणि विदर्भात 30 जून या तारखांना शाळा सुरु होणार आहेत. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांसाठी मात्र संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.