Site icon सक्रिय न्यूज

लेखी आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे….!

केज दि.26 – मागच्या दोन दिवसापासून केज विकास संघर्ष समितीच्या वतीने उमरी रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी नगरपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू केले होते. मात्र दोन दिवसानंतर नगरपंचायत प्रशासनाने येत्या एक मे पर्यंत काम सुरू करण्याबाबत लेखी पत्र दिल्यामुळे घंटानाद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
            केज शहरातील विविध विकासकामांसह उमरी रस्त्याच्या बांधणीसाठी निधी येऊनही या न त्या कारणामुळे काम आतापर्यंत रेंगाळत पडलेले आहे. केज विकास संघर्ष समिती व शहरातील नागरिकांच्या वतीने कित्येकदा रस्ता तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. परंतु अद्याप पर्यंत रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी आरपारची लढाई सुरू करत केज नगरपंचायत समोर मागच्या दोन दिवसांपासून घंटानाद आंदोलन सुरू केले होते.  मात्र दोन दिवस झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि संबंधित ठेकेदाराला सर्व बाबींची पूर्तता करून येत्या एक तारखेपर्यंत काम सुरू करण्यासंबंधी आदेशित करण्यात येईल असे लेखी पत्र केज विकास संघर्ष समितीला दिल्यानंतर घंटानाद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

             दरम्यान, यापूर्वीही अनेकदा आंदोलन केल्यानंतर संघर्ष समितीची समजूत काढून आंदोलन मागे घ्यायला लावलेले आहे.त्यामुळे आताही दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता होते की आश्वासनच राहते ? याची उत्सुकता केजवासीयांना आहे.

शेअर करा
Exit mobile version