केज दि.३० – मागच्या कांही दिवसांपासून तालुक्यातील अनेक कलाकार आणि कलाकृती समोर येताना दिसत आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील भोपला गावचा एक उमदा तरुण कलाकार कोयता चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
1 मे दिनानिमित्त ‘कोयता’ या शॉर्ट फिल्मचे उस्मानाबाद येथे उद्घाटन होत आहे.यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, खासदार, आमदार तसेच पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. या फिल्ममध्ये केज तालुक्यातील भोपला या गावचे लक्ष्मण हजारे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
लक्ष्मण हजारे हे सामाजिक क्षेत्रात केज तालुक्यात अग्रेसर असतात. महिलांचे अधिकार तसेच बालकांचे अधिकार या संदर्भात त्यांचे काम आहे. हे करत असतानाच त्यांनी भूमिपुत्र वाघ दिग्दर्शित ‘कोयता’ या फिल्ममध्ये काम करण्याचे ठरवले आणि नायकाची भूमिका साकारत आहेत. या फिल्ममध्ये ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडण्यात आलेले आहेत.
दरम्यान, केज तालुक्यातील इतरही कलाकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. नुकत्याच कांही दिवसांपूर्वी आधान चित्रपटात चिंचोली माळी येथील समाधान गालफाडे हे मुख्य भूमिकेत होते.तर प्रा. ज्ञानेश कलढोने यांच्या शॉर्ट फिल्मचे एएसपी पंकज कुमावत यांच्या हस्ते प्रदर्शन करण्यात आले आहे.त्याच बरोबर केजच्या सुरेश बोर्डे या कलाकारानेही फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे. तालुक्यातील अन्य कलाकारही अभिनय क्षेत्रात पुढे येत असल्याने तालुक्याचे नाव होताना दिसत आहे.