Site icon सक्रिय न्यूज

पुन्हा कोणत्या ”तांत्रिक” मुद्द्यात अडकले उमरी रस्त्याचे काम…..?

केज दि.९ – मागच्या आठ दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून उमरी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. यावेळी येत्या दोन ते चार दिवसांमध्ये सदरील रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईल असे नगराध्यक्ष, गटनेते त्याचबरोबर मुख्याधिकारी यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही सदरील रस्त्याचे काम सुरू न झाल्याने पुन्हा एकदा उमरी रस्ता लगत राहणाऱ्या रहिवाशांच्या आणि केज विकास संघर्ष समितीच्या तोंडाला नगरपंचायतने पाणी पुसले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

                  मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि रखडत पडलेल्या उमरी रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता वाटत होती. सदरील रस्त्यासाठी मागच्या वर्षीच 98 लाख रुपयाचा निधीही नगरपंचायत कडे येऊन पडला. मात्र काम सुरू होत नसल्याने केज विकास संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन झालं आणि उमरी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला. तर मागच्या महिन्यामध्ये इतर विकास कामांबरोबर उमरी रस्त्याच्या कामाचेही उद्घाटन नगरपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आले. आणि आता रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा उमरी रस्ता वासीयांना यांना होती. मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही.
          केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा चा प्रमुख रस्ता असलेला उमरी रोड हा मागच्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. चालणे आणि वाहने चालवणे या रस्त्यावरून मुश्किल झालेले आहे. त्यामुळे केज विकास संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु त्या प्रश्नाला काही वाचा फुटत नव्हती. मात्र मागच्या वर्षी उमरी रस्त्यासाठी नगरपंचायत कडे 98 लाख रुपयांचा निधी आला आणि केज विकास संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे नगरपंचायत कार्यालयामध्ये इतर विकास कामांबरोबर उमरी रस्त्याच्या कामाचेही औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मात्र काम काही सुरू होत नव्हते. त्यामुळे केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी पुन्हा नगरपंचायत समोर घंटानाद आंदोलन केले आणि दोन दिवस आंदोलन केल्यानंतर नगरपंचायत च्या वतीने एक मे रोजी काम करण्याचे लेखी आश्वासन दिले.मात्र एक मे रोजी उद्घाटन काही झाले नाही. परंतू दोन मे रोजी पंचायत समितीच्या पाठीमागे जिथून उमरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सीता बनसोड त्याचबरोबर जनविकास परिवर्तन आघाडीचे हारून इनामदार यांच्यासह मुख्याधिकारी महेश गायकवाड व काही नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष त्याचबरोबर हारुण इनामदार, मुख्याधिकारी यांनी बोलताना सदरील काम सात तारखेला सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र सात तारीख निघून गेली तरी अद्याप उमरी रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. पुन्हा काय अडचण आली ? पुन्हा कोणत्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये सदरील रस्त्याचे काम अडकले आहे हे मात्र नागरिकांना लक्षात येत नसल्याने उमरी रस्ता होणार की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे ? केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले यांनीही पाठपुरावा केला मात्र त्यांच्या पाठपुराव्याला आणि केज विकास संघर्ष समितीच्या तोंडाला पाणी पुसले की काय ? असाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
            सर्वात जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न कधी मार्गे लागतो याकडे रहिवाशांचे लक्ष लागले असून आता या कामाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू होऊ लागलेली आहे. सदरील काम दोन टप्प्यांमध्ये होणार असून 98 लाख रुपयांमध्ये राजर्षी शाहू शाळेपर्यंत काम होणार असून त्या पुढील काम हे केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या विकास निधीतून होणार आहे. मात्र एकदा काम सुरू झाल्यानंतर खंड न पडू देता सलग काम करण्याची मागणी ही उद्घाटन प्रसंगी रहिवाशांनी केली होती. मात्र पहिल्याच टप्प्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने पुन्हा शंका कुशंका निर्माण होऊ लागलेल्या आहेत. यामध्ये आता केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर नगरपंचायत ने समोर येऊन आपली भूमिका मांडावी अशी मागणी होत आहे.
शेअर करा
Exit mobile version