केज दि.२३ – दोन वेळेस उद्घाटन होऊनही या न त्या कारणाने रेंगाळत पडलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याचे काम आज प्रत्यक्ष सुरु झाल्याने सदरील भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा या दोन प्रभागाला जोडणारा प्रमुख उमरी रस्ता हा मागच्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होता. केज विकास संघर्ष समिती तसेच सदरील भागातील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली, अर्ज विनंती केल्या मात्र काम काही मार्गी लागत नव्हते. तर सदरील रस्त्यासाठी आलेल्या 98 लक्ष रुपयांमधून सदरील कामाचे उद्घाटन मागच्या एक महिन्यापूर्वी करण्यात आले होते. परंतु काम काही सुरू करण्यात आलेले नव्हते. काम सुरू करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने मार्क आउट केले मात्र मार्क आउट मध्ये अनेकांची घरे आणि घरांचे कंपाउंड वॉल हे रस्त्यावर येत असल्याने पुन्हा काही दिवस काम रेंगाळत पडले होते.त्यामुळे पुन्हा एकदा मोजमाप करण्यात आले. आणि आज दिनांक 23 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून ज्यांची घरे किंवा घराचा काही भाग अर्थात कंपाउंड पायऱ्या हे जर रस्त्यावर आलेले असेल तर त्यांनी काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
दरम्यान सदरील रस्ता हा एकूण 33 फुटाचा असल्याने काम करणाऱ्या यंत्रणेला जर रहिवाशांनी अतिक्रमणित भाग स्वतः काढून सहकार्य केले तर तात्काळ काम पूर्णत्वाकडे जाईल व नगरपंचायतला कायदेशीर मार्गाचा अवलंबही करावा लागणार नाही.मात्र तेहतीस फुटाचा रस्ता होऊ घातल्याने उमरी रस्त्यावरील रहिवासी आता सुखावले असून मागच्या कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्यावरून जी काही वाहतूक सुरू होती त्याला आता पूर्णविराम मिळणार असून चांगल्या रस्त्याचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद संबंधित भागातील रहिवाशी व्यक्त करत असून नगरपंचायत तसेच केज विकास संघर्ष समितीचे आभार व्यक्त करत आहेत.