केज दि.३० – शहरातील क्रांती नगर भागामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही आरोग्यदायी योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्याच धर्तीवर शहरातील फुलेनगर भागामध्ये शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरील आरोग्य केंद्राचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी क्रांतीनगर भागामध्ये रुग्णांच्या सेवेमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे. सदरील दवाखान्यामध्ये दैनंदिन 30 ते 35 रुग्ण लाभ घेत आहेत. आणि इतर परिसरातील रुग्णांनाही आपल्या जवळच आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र शहरातील फुले नगर भागात केदार निवास या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. सदरील केंद्रावर एक एमबीबीएस डॉक्टर, नर्स, सेवक हे दुपारी दोन ते दहा वेळेत रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहेत. सदरील केंद्रामध्ये तपासणी, औषधी मोफत दिले जाणार आहेत आणि रक्त आणि लघवी तपासणीची ही सोय त्या ठिकाणी मोफत करण्यात आलेली आहे. रुग्णांना घराच्या जवळच उपचार घेता यावेत, दूरवरच्या दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्यदायी योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगाने सदरील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.
तरी परिसरातील रुग्णांनी सदरील आरोग्य केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास आठवले यांनी केले आहे.