केज दि.४ – मागील दोन वर्षांपासून अस्मानी सुलतानी संकटं, उत्पादन खर्चात झालेली मोठी वाढ शेतमालाचे घसरलेले भाव यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पीछेहाट झाल्याने परिस्थिती बिकट बनली आहे.आता ऐन उन्हाळ्यात शेती पंपांना लागणाऱ्या विजेचे संकट शेतकऱ्यावर ओढावले आहे.
केज तालुक्यातील माळेगाव येथील ३३/११केव्ही सबस्टेशन वरील दहा गावातील शेतकरी व नागरिक वीजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत.शेती पंपांना वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वाढत्या उन्हाच्या तडाख्याने ऊस करपू लागला आहे.पाणी साठा उपलब्ध आहे पण विजेआभावी पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.’वीज संकट शेतकऱ्यांच्या मुळावर अन महावितरण कंपनीने व लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर’ असे चित्र पाहायला मिळत आहे.या सतत भेडसावणाऱ्या विज प्रश्नांवर कुणालाही देणंघेणं नसल्याचे दिसून येत असून वीज धोरणांवर जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
माळेगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रावरून माळेगाव, सुकळी, मोटेगाव,गोटेगाव, सुर्डी सोनेसांगवी, मांगवडगाव,तेली वस्ती ,लाखा, सातेफळ या दहा गावांना वीजपुरवठा होतो.महावितरण च्या ढिसाळ कारभारामुळे लाईट फॉल्ट,लोडशेडिंग, परमीट व ओव्हरलोड ट्रिप यामुळे तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने कडक उन्हाळ्यात दहा गावातील घरगुती विजग्राहक व शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. सध्याच्या प्रचंड तापमानात ऊस जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त भारिनयमन व कोलमडलेले वेळापत्रक यामुळे तासनतास वीज गुल होत असल्याने पाणी साठा उपलब्ध असुनही पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे ऊसाची पाण्याअभावी वाढ खुंटली असून काही ठिकाणी ऊस वाळून जात आहे.
तसेच सध्या उन्हासोबत उकाडाही प्रचंड वाढला आहे. दिवसा रात्री कधीही लाईट गुल होत असल्याने पंखा, कुलर बंद राहत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. माळेगाव ३३/११ केव्ही उपकेंद्रावर चार वेगवेगळ्या फिडरवरून शेतीसाठी रोज केवळ सहा तास थ्री फेज विजपुरवठा केला जात आहे. या तासांपैकी लाईट फॉल्ट, परमिट, ओव्हरलोडमुळे ट्रिप या कारणामुळे तासनतास वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सहा तासांपैकी किती तास लाईट मिळते हा संशोधनाचा विषय आहे.
दरम्यान, सध्या विजेची मागणी जास्त आहे.उच्च दाबाने विज पुरवठा सुरू रहावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. माळेगाव उपकेंद्र एका वेळी २३० एंपियर लोड घेऊ शकतो, या क्षमतेपेक्षा जास्त विजेचा दाब आला की वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सिंगल फेज व थ्री फेज एकावेळी चालत नाही. वीज पुरवठा सुरुळीत व उच्च दाबाने होण्यासाठी ५ एमव्हीए ट्रांसफार्मर ची आवश्यक असून त्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली असल्याचे सहाय्यक अभियंता ए. व्ही. जाधव यांनी सांगितले .