(प्रतिकात्मक फोटो)
केज दि.१३ – मागच्या कित्येक वर्षांपासून केज शहराची ओळख ही टपरीचे शहर म्हणून झालेली आहे. मात्र आता प्रशासनाने सदरील अतिक्रमणावर हातोडा उचलण्याचा निर्धार केला असून अतिक्रमण धारकांना 15 तारखेपर्यंत आपापले अतिक्रमण काढून घेण्याची मुदत दिली असून जे कोणी काढणार नाहीत त्यांच्या अतिक्रमणावर दिनांक 16 रोजी हातोडा पडणार असल्याची माहिती केज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
सोमवारी केज तहसील मध्ये शहरातील सर्व खाते प्रमुखांची बैठक उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी शहरातील शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूला असलेले तसेच मेन रोडवर असलेले अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकण्याचा सदरील बैठकीत निर्णय झाला आहे. आणि तश्या सूचना सर्व खाते प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे दिनांक 15 जून पर्यंत काढून घ्यावीत अन्यथा दिनांक 16 रोजी कुणाचीही गय न करता अतिक्रमण काढण्यात येईल असा इशारा सर्व अतिक्रमणधारकांना देण्यात आलेला आहे. दरम्यान,मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे आता निघणार असल्याचे निश्चित झाले आहे आणि टपरीचे शहर म्हणून जी केज शहराची ओळख आहे ती पुसल्या जाण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.