(प्रतिकात्मक फोटो)
केज दि.१५ – शहरातील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिलेली मुदत आज मध्यरात्री समाप्त होत आहे. त्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु जे काही अतिक्रमणे राहणार आहेत त्यावर प्रशासनाच्या वतीने उद्या सकाळपासूनच हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात जमावबंदी आदेश आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी निर्गमित केला आहे.
मागच्या आठ दिवसापूर्वी केज शहरात शासकीय जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत त्यांनी आपापली अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावीत असे आदेश देण्यात आले होते. आणि अतिक्रमणे काढून घेण्यासाठी 15 जून पर्यंत त्यांना मुदत देण्यात आलेली होती. आणि ती मुदत आज मध्यरात्री बारा वाजता संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जी काही अतिक्रमणे राहतील ती काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जयत तयारी झालेली आहे. सदरील अतिक्रमणे काढण्यासाठी जेसीबी. ट्रॅक्टर यांची तयारी करण्यात आली असून जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना आता आपली जागा सोडावी लागणार आहे. आणि जे सोडणार नाहीत त्यांच्यावर हातोडा पडणार हे निश्चित झालेले आहे. शहरात उद्या तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून ज्या त्या कार्यालयाचे जे प्रमुख आहेत त्यांना शासकीय जागेत जी अतिक्रमणे आहेत ती पूर्णपणे काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून कसल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी आज मध्यरात्रीपासून ते 30 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे पत्र निर्गमित केलेले आहे.
दरम्यान, केज शहरात ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये अतिक्रमणे आहेत ते पूर्णपणे काढण्यात येणार असून यामध्ये कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेवर एएसपी पंकज कुमावत हे स्वतः लक्ष देऊन आहेत. त्यामुळे मागच्या अनेक वर्षांपासून केज शहराची जी टपऱ्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण झालेली होती ती आता पुसल्या जाणार अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.