Site icon सक्रिय न्यूज

दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला…..! 

दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला…..! 
केज दि.५ – उसने घेतलेल्या पैशावरून एकाने धारदार चाकूने दोघांच्या छातीवर व पोटावर वार करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना मस्साजोग ( ता. केज ) रस्त्यावरील राजदीप हॉटेलसमोर २९ जून रोजी रात्री उशिरा घडली होती. रुग्णालयातून घेतलेल्या जबाबवरून ४ जुलै रोजी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
       केज शहरातील समर्थ नगर, ४ थी गल्ली भागातील वाहन चालक अझरुद्दीन मैनोद्दीन सय्यद ( वय २४ ) यांच्याकडून राजपाल सुभाष मनेरी ( रा. अहिल्यादेवी नगर, केज ) याने ३० हजार रुपये उसने घेतले होते. ते उसने घेतलेल्या पैशाची परत मागणी करीत होते. राजपाल याने उसने घेतलेले ३० हजार रुपये तुला देतो, तू मस्साजोगकडे ये असे सांगितले. त्यावरून अझरुद्दीन सय्यद हे २९ जून रोजी रात्री ११.२० ते ११.३० वाजेच्या दरम्यान मस्साजोग रस्त्यावरील राजदीप हॉटेलसमोर गेले असता त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर राजपाल मनेरी याने तुझे कशाचे पैसे असे म्हणत शिवीगाळ करून धारदार चाकूने अझरुद्दीन सय्यद यांच्या छातीवर दोन वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मित्र अजय जाधव हा सोडविण्यासाठी आला असता त्याच्या पोटावर राजपाल याने दोन वार करुन त्याला पण जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून अझरुद्दीन सय्यद यांनी दिलेल्या जबाबावरून राजपाल मनेरी याच्या विरुद्ध केज पोलिसात कलम ३०७ भादवि अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार वैभव सारंग हे तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version