केज दि.१४ – तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पुनम महादेव सोनवणे हिची एमपीएससीमार्फत महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील पुरुषोत्तम दादा सोनवणे विद्यालयामध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या पूनम महादेव सोनवणे हिला सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. पदवी चे शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. तसेच डीएड झाल्यानंतर तिने शिक्षिका म्हणूनही काही दिवस काम केले. मात्र स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पद मिळवण्याच्या उद्देशाने ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये ती मुलींमध्ये महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकावर उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक म्हणून तिची निवड झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि सर्वसामान्य कुटुंबातून तिने आपले ध्येय साध्य केल्याबद्दल वीर हनुमान शिक्षण संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, प्राचार्य पी.एच लोमटे, सरपंच प्रवीण संतोष सोनवणे यांच्यासह सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे.