केज दि.२२ – गेल्या 35 वर्षांपासून केज येथील एसटी डेपोचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न तत्काळ सोडवावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी (दि.20) दिले. या निवेदनावर केजचा एसटी डेपोचा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश श्री.शिंदे यांनी परिवहन विभागाच्या सचिवांना दिले आहेत.
केज शहरात केज-बीड महामार्गालगत 35 वर्षांपूर्वी एसटी डेपोसाठी 7 एकर 13 गुंठे जागा घेण्यात आली आहे. केज हे प्रमुख मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी एसटी डेपो असणे गरजेचे आहे. परंतु नियोजित जागेवर डेपो बांधकामाची कसलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे डेपोच्या जागेवर अतिक्रमण होत आहे. या प्रश्नी केज येथील अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. या केजवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल घेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यानंतर श्री.शिंदे यांनी परिवहन विभागाच्या सचिवांना प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.अशी माहिती शिवसेनेचे केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे यांनी दिली.
दरम्यान, या पूर्वीही केज विकास संघर्ष समिती च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनीही अनेकदा निवेदने देऊन आंदोलनही केलेले.मात्र आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्याने प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.