केज दि.३ – एका ४० वर्षीय इसामाचे अज्ञात व्यक्तीसोबत भांडण झाल्याने त्या व्यक्तीने डोक्यात दगड मारला. या मारहाणीमुळे गंभीर झालेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना केज शहरातील कानडी रस्त्यावर घडली. मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील भीमनगर भागातील सचिन यशवंत कांबळे ( वय ४० ) हा इसम ३१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कानडी रस्त्यावरील रंगोली कलेक्शन समोर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला होता. हे पाहून सचिनचा भाचा विजय घोडके याने मित्राच्या मदतीने त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी डोक्याला टाके घेत उपचार केल्यानंतर रात्री ८ वाजता घरी आणले. यावेळी सचिन कांबळे यास त्याची आई पौर्णिमा कांबळे यांनी कोणी मारहाण केली अशी विचारणा केली असता त्याने तो आणि त्याच्या ओळखीचा मुन्ना शिंदे ( रा. फुलेनगर, केज ) असे दोघे कानडी रस्त्याने जात असताना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रंगोली कलेक्शनसमोर एका अनोळखी इसमासोबत त्याचे भांडण झाले. सदर अनोळखी इसमाने डोक्यात दगड मारुन जखमी केल्याचे सांगितले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सचीन कांबळे यास त्रास होत असल्याने त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र पहाटे ५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
सचिन कांबळे याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड मारून जखमी केले. त्या झालेल्या दुखापतीमुळे सचिन यशवंत कांबळे याचा मृत्यू झाला. अशी तक्रार त्याची आई पौर्णिमा यशवंत कांबळे यांनी दिल्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजेश पाटील हे तपास करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आण्णा निवृत्ती चौरे ( रा. नागझरी ता. केज ) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक दिलीप गित्ते, बाळासाहेब अहंकारे यांनी डोंगरात लपून बसलेल्या या आरोपीला ४ किमी पायी जाऊन अटक केली आहे.