Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये माजी सैनिकाचे दिवसाढवळ्या घर फोडले 

केज दि.७ – घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कटरने दरवाजाचे कडीकोंडे तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील दागिन्यासह नगदी ३९५०० रुपयांचा रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज शहरातील उमरी रस्त्यावरील द्वारका नगरीत गुरुवारी दुपारी १२.३० ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. 
         केज तालुक्यातील लव्हूरी येथील  सतीश निवृत्ती चाळक हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांचे वडील निवृत्ती चाळक हे सुद्धा निवृत्त सैनिक होते. त्यांचे कुटुंब हे केज शहरातील उमरी रस्त्यावर असलेल्या द्वारका नगरीत वास्तव्यास आहे. तर निवृत्ती चाळक हे आजारी असल्याने त्यांना लातूरला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी सतीश चाळक यांनी रक्कम आणून कपाटात ठेवली होती. मात्र रविवारी निवृत्ती चाळक यांचे निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर मूळगावी लव्हूरी येेथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या दिवसापासून त्यांचे कुटुंब गावी आहे. तर सतीश चाळक यांचा मुलगा व मुलगी हे केजच्या घरी होते. गुरुवारी दुपारी १२ वाजता चाळक यांचा मुलगा जेवणाचा डबा आणण्यासाठी घराला कुलूप लावून लव्हूरीला गेला होता. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कटरने दरवाजाचे कडीकोंडी तोडून घरात प्रवेश केला. कपाट तोडून कपाटातील ३९५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सतीश चाळक यांचा मुलगा दुपारी तीन वाजता लव्हूरी येथून डबा घेऊन घरी आला असता हा प्रकार निदर्शनास आला.
      दरम्यान, सतीश चाळक यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version