Site icon सक्रिय न्यूज

यावर्षी पुन्हा एकदा पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याचे चित्र…..!

यावर्षी पुन्हा एकदा पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याचे चित्र…..!

बीड दि. १९ – पीक विम्यासाठी झालेल्या घोटाळ्यांची बीड जिल्ह्याची देशात अब्रू गेलेली असतानाच अजूनही जिल्ह्यातील पीक विमा माफियांचे कारनामे थांबायला तयार नाहीत. यावर्षी पुन्हा एकदा पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे चित्र आहे. अनेक पिकांच्या बाबतीत पेरणी केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्राचा विमा उतरविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागानेच सदरची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करण्याचे आदेश दिले आहेत.

               बीड जिल्ह्यात पीक विमा योजनेचा गैरफायदा उठविणारे काही विमा माफिया पोसले गेलेले आहेत. यापूर्वी अशा माफियांमुळेच जिल्ह्याची देशभरात अबू गेली, अगदी कॅगने देखील आपल्या अहवालात याबाबत ताशेरे ओढले होते. मात्र माफियांवर कठोर कारवाई होत नसल्याने असल्या वृत्ती पुन्हा डोके वर काढत आहेत. यावर्षी एक रुपयात पीक विमा असे धोरण सरकारने आखल्यामुळे अशा माफियांचे अधिकच फावल्याचे चित्र आहे.
                      बीड जिल्ह्यात अनेक पिकांच्या बाबतीत प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्राचा विमा ल्या पिकासाठी उतरविण्यात आल्याचे समोर आले आहे. आढावा बैठकीच्या दरम्यान अधीक्षक कृषी अधिकान्यांनीच सदरची बाब जिल्हाधिकान्यांच्या नजरेस आणली. याचे आताच निराकरण केले नाही, तर उद्या पीक विमा कंपनी आक्षेप घेईल आणि पात्र शेतकरी विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतील असे अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या संपूर्ण क्षेत्रांची ग्राउंड ट्रुथिंग करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पीक विमा कंपनीने ड्रोन उपलब्ध करून द्यावेत अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यात काही लोकांनी पीक विम्याचा धंदा करण्याची माफियागिरी सुरु केली आहे. यापूर्वी एकदा विमा कंपनीने अशा काही शेतकऱ्यांची यादी प्रशासनाला दिली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करणार होते . मात्र पुन्हा शेतकरी आहेत या भावनेतून सदर प्रकरण थंड्या बस्त्यात गेले. त्यामुळे असली माफियागिरी करणारांचे चांगलेच फावले आहे. यात प्रशासनाचा दृष्टिकोन शेतकऱ्यांना मदत मिळते असा असला या तरी या काही मूठभर घोटाळेबाजांमुळे जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकत्र्यांना फटका बसतो. कधी अतिरिक्त क्षेत्राचे तर कधी आणखी कांही कारण सांगून विमा कंपनी जिल्ह्यातील किंवा संबंधित मंडळातील सर्वच शेतकऱ्यांची भरपाई रोखून ठेवते , याचा त्रास मात्र सामान्यांना सहन करावा लागतो . त्यामुळे आता तरी  असले माफिया पोसण्याऐवजी प्रशासनाने त्यांच्या मुसक्या बांधाव्यात आणि पुढाऱ्यांनी शासनाला तसे करू द्यावे.

शेअर करा
Exit mobile version