केज दि.२९ – तालुक्यातील उमरी येथील अतिक्रमित गायरान जमिनीवर होऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि नगर जिल्ह्यातील दलित युवकांना अमानुष पद्धतीने मारहाण झाल्याच्या निषेधार्थ केज तालुका रिपाइंच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे.
केज तालुक्यातील उमरी येथील सरकारी गायरान जमीन ही भूमिहीन अनेक वर्षा पासून अतिक्रमण करून वहिती करत आहेत. त्यातील पिकांवर त्यांच्या कुटुंबाची गुजराण करीत होते. त्या अतिक्रमणांची एक-ई या महसुली अभिलेख्याला नोंद देखील झालेली आहे. गायरान जमिनीवरील भूमिहिनांनी केलेले अतिक्रमणे नियमित करण्या संदर्भात वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. या गायरान जमिनीवर खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र या गायरान जमिनी संदर्भात सज्जाच्या तलाठ्याने चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप रिपाइं (ए) ने केला असून उभ्या पिकात एम एस डी सी एल बीड या सौर उर्जा प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीने त्यांचे बोर्ड लावले आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे शेळ्या आणि कबुतरांची चोरी केल्याच्या आरोपावरून तीन दलित युवकांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केली व त्याची व्हीडिओ क्लिप काढून ती सोशल मिडियावर व्हायरल केली. त्याच्या निषेधार्थ दि. २९ ऑगस्ट रोजी रिपाइं (ए) चे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालया समोर गायरानधारक आमरण उपोषणला बसले आहेत. आंदोलनात तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, जिल्हा सल्लागार उत्तम मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, शहराध्यक्ष भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, कैलास जावळे, दिलीप बनसोडे, विकास आरकडे, मसू बचुटे, विजय डोंगरे, रुपचंद ढालमारे, रघुनाथ ढालमारे, प्रशांत ढालमारे, लोचना सोनवणे यांच्यासह रिपाइंचे अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.