Site icon सक्रिय न्यूज

चिंताजनक…! एकाच वस्तीवरील 12 रहिवासी बाधित

केज दि. 8 – केज तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा आकडा फुगत चालला आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या सहवासातील लोक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर कांही नवीन रुग्ण समोर येत आहेत.
       दरम्यान शुक्रवारी आलेल्या केज तालुक्याच्या अहवालात 24 बाधित रुग्णांपैकी एकाच (गोपाळ वस्ती,कानडी माळी) छोटाश्या वस्तीवरील 12 रहिवासी कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये 2, 5, 7, 9,10 इत्यादी वयोगटातील 5  बालकांचा समावेश असल्याने चिंता वाढली आहे. सदरील वस्तीवरील एका 70 वर्षीय महिलेला इतर आजाराच्या संदर्भात अंबाजोगाई येथे भरती केले असता कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर इतरांचे स्वॅब घेण्यात आले होते. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू झाला असून सहवासितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बाहेर वावरताना ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना वारंवार सांगितल्या जात आहेत त्याची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक झाले आहे. तालुका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. बाधित रुग्णांचा परिसर प्रतिबंधित करून सदरील भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व्यापारी महासंघाच्या वतीने दि.8 ते 13 पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी व सचिव सुहास चिद्रवार यांच्या वतीने करण्यात आले असून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र शेवटी जबादारी नागरिकांची असून स्वतः ला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
        दरम्यान शनिवारी सकाळी तालुक्यातील एकूण 93 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली असून रात्री उशिरापर्यंत अहवाल प्राप्त होतील.
शेअर करा
Exit mobile version