केज दि.7 – शहरातील दोन युवक श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी रात्री घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकी पासून एक टेम्पो पुढे गेला. सदरील टेम्पो त्यांच्याजवळ आला असता त्यांना त्या टेम्पोतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आली. आणि त्या दुर्गंधीवरून त्या दोन युवकांना वेगळाच काहीतरी संशय आला म्हणून त्या दोघांनी सदरील टेम्पो पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु बरेच किलोमीटर अंतर पार करूनही टेम्पो थांबला तर नाहीच, उलट त्या टेम्पोचालकाने या दोन युवकांच्या दुचाकी वर टेम्पो घालण्याचा प्रयत्न करत फरार होण्यामध्ये यशस्वी झाला.
ज्ञानेश्वर कोरडे आणि अमरजीत धपाटे हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री दुचाकीवरून घराकडे चालले होते. त्यादरम्यान त्यांना ओव्हरटेक करून एक टेम्पो (MH 23 – 1580) पुढे गेला. मात्र तो टेम्पो त्यांच्याजवळून जात असताना त्या दोघांना मांसाची येते तशी दुर्गंधी आली आणि म्हणून त्यांना वेगळाच संशय आला. सदरील टेम्पो मधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी कशाची आली ? हे जाणून घेण्यासाठी त्या दोघांनी दुचाकी वर टेम्पोचा पाठलाग केला आणि टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र टेम्पो चालकाने टेम्पो न थांबवता तसाच पुढे वेगाने मार्गस्थ केला. मात्र या दोघांनी जीवाची पर्वा न करता सदरील टेम्पोचा केज बीड रोड ने जैताळवाडी पर्यंत पाठलाग सुरू ठेवला. त्यादरम्यान एक ते दोन वेळेस त्या टेम्पोचालकाने या दुचाकी वर टेम्पो घालण्याचाही प्रयत्न केला, आणि दोघे युवक आपलाच पाठलाग करत आहेत याचा संशय बळावल्याने टेम्पो चालकाने तो टेम्पो मुख्य रस्त्यावरून बाजूला घेतला व त्या ठिकाणी टेम्पो थांबून या तरुणांचा मागोवा घेतला. हे तरुण आपल्याकडेच येत आहेत असे लक्षात आल्यानंतर त्याने तो टेम्पो वेगळ्याच मार्गाने मार्गस्थ केला. जेव्हा यांनी हा टेम्पो मुख्य रस्त्याच्या बाजूला घेतल्याचे पाहिले तेव्हा त्या ठिकाणी टेम्पो जवळ कुणीतरी अज्ञात दहा ते बारा जण आहेत असे या तरुणांना दिसून आले. सदरील टेम्पो थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर कोरडे आणि अमरजीत धपाटे यांनी नेकनूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि हे एका हॉटेलवर सुरक्षित ठिकाणी थांबले. परंतु पोलीस आणि इतर त्यांचे मित्र येण्याअगोदर तो टेम्पो त्या ठिकाणाहून फरार झाला. पुढे तो कुठे गेला याचा काही सुगावा लागला नाही.
दरम्यान सदरील टेम्पोमध्ये नेमके काय होते ? कुठून आला होता ? कुठे चालला होता ? आणि जर संशयास्पद काही नसेल तर टेम्पो का थांबवला नाही ? या सर्व प्रश्नांची उकल आता पोलिसांना करावी लागणार आहे. तो टेम्पो थांबवण्यामध्ये तरुणांना यश जरी आले नसले तरी मात्र त्यांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.