Site icon सक्रिय न्यूज

धनेगाव फाट्यावर केला दोन तास चक्का जाम….!

केज दि.७ – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर आता आंदोलने केली जात आहेत. बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी दि.७ रोजी बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील धनेगाव फाटा याठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल दोन तास हे आंदोलन चालले.
                   राज्य सरकार व विशेषत: जालना जिल्ह्यातील उपोषणात पोलिसांनी केलेल्या लाठचार्ज चा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राज्य सरकार केवळ वेळ काढू पणा करत असून आता जे पुरावे तपासले जात आहेत ते सर्व पुरावे सरकारकडे आहेत. त्या पुराव्याच्या आधारे जरी आरक्षण दिले तरी ते आरक्षण टिकणार आहे का ? हे पण पहावे लागेल. अन्यथा सरकार पुन्हा केवळ वेळ काढू पणाच करेल त्यामुळे आता आरक्षण द्यायचं असेल तर टिकणारं द्या, समाज आता वेडा नाही. आणि केवळ कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रश्न निकाली लागणार नाही तर सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यानी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाविषयी केवळ नौटंकी करू नये, कारण जालन्यात केलेला सर्व प्रकार समाजाला माहीत आहे त्यामुळे समाजाच्या भावनांशी आपण खेळू नये अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त झाल्या.
              यावेळी उपजिल्हाधकारी शरद झाडके यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून निवेदन स्विकारले. खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाज याठिकाणी जमला होता. मात्र तेवढ्याच शांततेत हे आंदोलन पार पडले. यावेळी राज्य सरकारचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. व नो आरक्षण नो शिक्षण असा नारा देत जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवून पुस्तकांचे दहन केले. यावेळी कु. आरती अभिमन्यू चौधरी, श्रेया गणेश पवार व अक्षरा अंगद चौधरी या तीन मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
                   दरम्यान, याच धर्तीवर आता केज तालुक्यातील कुंबेफळ व ढाकेफळ गावच्या हद्दीवर शनिवारी मोठे आंदोलन करण्याचा इशारा या भागातील मराठा समजाच्या तरुणांनी दिला आहे. त्यामुळे आता आरक्षण मिळाल्याशिवाय हे सत्र थांबणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आल्याचे दिसून येत आहे
शेअर करा
Exit mobile version