बीड, ८ – मराठा आंदोलनासाठी जीवाची पर्वा न करता मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा ११ वा दिवस आहे. गेल्या ११ दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कण देखील खाल्ला नसल्याने त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून बीड जिल्ह्यातील महिला आक्रमक झाल्याचे दिसते आहे.
बीड तालुक्यातील वासनवाडी या गावातील चार महिलांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत आंदोलन केले आहे. शिंदे सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र आम्हाला कुठलेही निकष न लावता सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत या मागणीसाठी बीडमधील या महिलांनी अनोखं आंदोलन केलं आहे. यावेळी शासनाचा निषेध करत प्रचंड घोषणाबाजी सुद्धा महिलांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या दफन आंदोलनाची बातमी प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर अधिकारी गोंधळले. आंदोलकांची भेट घेण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.