माळेगाव दि.१२ – मराठा समाजाला आरक्षण मागणीसाठी व अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी केज तालुक्यातुन जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील सुर्डी-सोनेसांगवी फाट्यावर मंगळवारी (दि१२सप्टेंबर)
सकल मराठा समाजाच्या वतीने दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा देण्यासाठी केज तालुक्यातील सुर्डी- सोनेसांगवी, माळेगाव मांगवडगाव, सातेफळ,कळंब येथील मराठा समाज रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाला.आजपर्यंत शांत असलेल्या मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली.परंतू,आता मराठा समाज जागा झाला आहे.मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.रस्ता रोको आंदोलनात महिलांसह पुरुष युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
‘एक मराठा लाख मराठा’ ‘जय जिजाऊ जय शिवराय’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या…’ आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा आरक्षण प्रकरणी सरकारने घेतलेल्या भूमिकेचा टायर जाळून निषेध करण्यात आला. दीड तास झालेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.रास्ता रोको वेळी आजारी बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला.मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी मस्के डी एम,तलाठी धुमाळ यांनी स्वीकारले.आंदोलनास युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.