केज दि.१९ – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वक्रतुंड गणेश मंडळ व वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवण्याची परंपरा वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठान व वक्रतुंड गणेश मंडळाने कायम टिकवून ठेवली आहे.
यावर्षीही सात दिवसीय भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन, त्याचबरोबर अनेक आजारांवरती ॲक्युप्रेशर, कपींग, वायब्रेशन थेरेपी ने उपचार व आरोग्य तपासणीचेही आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. भागवत कथेचे प्रवक्ते म्हणून भागवताचार्य बाळू महाराज उगले यांचे अमृततुल्य अशी संगीतमय भागवत कथा होणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे खेळ व महिलांसाठी संगीत खुर्ची, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच पाच दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर व त्या आजारावरती योग्य ते आधुनिक प्रकारे उपचार केले जाणार आहेत.
यामध्ये सांधेदुखी गुडघेदुखी, कंबर दुखी, ब्लड प्रेशर यासह अशा अनेक आजारांचे उपचार केले जाणार आहेत. तर भागवत कथेची वेळ दुपारी दोन ते पाच अशी असून दररोज सायंकाळी आठ ते दहा कीर्तन महोत्सवाचे आयोजन ही करण्यात आलेले आहे.