Site icon सक्रिय न्यूज

केज येथे जिल्हा हिवताप अधिकाऱ्याची भेट, तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना…..!

केज दि.२१ – तालुक्यात मागच्या अनेक दिवसांपासून साथ रोगांसाह डेंग्यूने थैमान घातले आहे. यामध्ये क्रांतीनगर भागातील एकाचा बळी गेल्यानंतर आरोग्य विभाग आणि नगरपंचायत ने तात्काळ दखल घेण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही आणि डेंग्यूने एका डॉक्टर युवतीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला.त्यानंतर आरोग्य विभाग थोडासा जागा झाला असून जिल्हास्तरीय अधिकारी केजला पोहोचले.
         अधिक माहिती अशी की, दिनांक 21/09/2023 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. उल्हास गंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हास्तरीय जिल्हा हिवताप  अधिकारी कार्यालय बीडच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम मार्फत, केज शहरामध्ये डेंगूणे मृत्यू पावलेल्या डॉ. फौजिया इनामदार यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. तसेच सविस्तर चर्चा करून रुग्णाची पूर्ण हिस्ट्री घेण्यात आली व सर्व कुटुंबीयांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच परिसरातील सर्व घरांचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून करण्यात आले व नगरपंचायतीस भेट देऊन संपूर्ण केज शहरात धूर फवारणी करण्याबाबत सूचना लेखी सूचना देण्यात आल्या. तर नगरपंचायतीने सफाई कर्मचाऱ्यातील काही सफाई कर्मचारी डेंग्यू चा उद्रेक संपेपर्यंत अबॅटिंग करता मदतीस देणे विषयी विनंती करण्यात आली. तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय केज येथे भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याविषयी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.सदर रॅपिड रिस्पॉन्स टीम मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांच्यासोबत जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक मजिद शेख व इतर आरोग्य कर्मचारी होते.

             दरम्यान, केज हे शहरी भागात येत असल्याने तालुका आरोग्य कार्यालयाच्या कामाला मर्यादा येतात. आणि त्यात पुन्हा केज आरोग्य विभागाकडे कर्मचारी तुटपुंजे असल्याने कामाचा अतिरिक्त भार पेलणे शक्य नाही. तर शहरी भागाची स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नगरपंचायत ची असूनही एवढा उद्रेक होऊनही म्हणावी तेवढी काळजी घेतल्या जात नसल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किमान आता तरी नगरपंचायत ने आरोग्य विभागाला मनुष्यबळ पुरवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.अन्यथा शहरात साथ रोगांसाह डेंग्यू चे रुग्ण शेकड्यावर दिसायला वेळ लागणार नाही.

शेअर करा
Exit mobile version