केज दि.३० (प्रतिनिधी) – तालुक्यातील घाटेवाडी येथील भिमराव बळीराम धुमक याने २५ मे २०१७ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात केज येथील सत्र न्यायाधीश के. डी. जाधव यांनी आरोपीला दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तर एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास दिड महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
पीडित मुलगी ही दि.२५ मे २०१७ रोजी घरी एकटी होती. तिचे आई वडील धार्मिक कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी आरोपी भीमराव धुमक याने या मुलीस केजला जाऊ असे म्हटले. या मुलीने नकार दिला असता तिला बळजबरीने कारमध्ये बसवून आंधोरा मस्सा या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पंढरपूर, आळंदी व भोसरी येथेही तिच्यावर अत्याचार केले. यानंतर नेकनूर येथे आणून सोडले. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन धुमक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक ए.एन. वाठोडे यांनी अति सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथे सुनावणी होवून अंतिम सुनावणी अति सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात के. डी. जाधव यांच्या न्यायालयात झाली. यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आला. सदर प्रकरणात न्यायालयासमोर झालेला पुरावा व सहाय्यक सरकारी वकील राम.बी.बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी भिमराव धुमक याला दोषी धरून वीस वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड ठोठावला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले. त्यांना सहा. सरकारी वकील आर. पी. उदार व एस. व्ही. मुंडे, पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सहकार्य केले.