Site icon सक्रिय न्यूज

नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सेवा सुविधांचा प्रश्न ऐरणीवर…..!

नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सेवा सुविधांचा प्रश्न ऐरणीवर…..!
नांदेड दि.५ – येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली. विरोधी पक्षातील नेत्यांसह सरकारनेही याची गंभीर दखल घेतल्याने रुग्णालयातील विविध प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. चौकशीचे आदेश देण्यात आले, अहवाल मागवण्यात आले. हे सर्व होत राहील. मात्र या प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अध्यापक संघटनेने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे अनेक बाबींची मागणी केली असून उणिवा दाखवल्या आहेत. त्यामुळे आता तरी अपुऱ्या सुविधा पूर्ण होतील की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
              वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयात प्रतिवर्षी पदवीपूर्व १५० विदयार्थी, प्रत्येक विषयातील पदव्युत्तर विदयार्थी, बी.पी.एम.टी. बी.एस.सी. नर्सिंग, डी.एम.एल.टी., सी.सी.एम.पी., एम.पी.एच. न्युट्रीशन इत्यादी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे अध्यापन केले जाते. याशिवाय या महाविद्यालयाशी सलग्न असलेल्या रुग्णालयात, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्हयातून तसेच तेलंगणा, व कर्नाटक या राज्यांतील सीमा लगतच्या भागातून रुग्ण उपचाराकरिता येतात. सदरील महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या १५० पदवीपूर्व विदयार्थी क्षमतेच्या मानकानुसार अध्यापकाची पदे भरण्यात आलेले नाहीत. तसेच पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या अध्यापनासाठी लागणारी पुरेसे अध्यापकांचे मनुष्यबळ या महाविद्यालयात उपलब्ध नाहीत. तसेच वाढीव पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता लागणा-या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार अध्यापकांची वाढीव पदनिर्मिती सुध्दा अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.
                याव्यतिरिक्त नांदेड शहरात जिल्हासामान्य रुग्णालय कार्यरत असूनसुद्धा या महाविद्यालयातील अध्यापकांना व्हिआयपी डयुटीवर पाठविण्यात येते. आपल्या महाविद्यालयातील तुटपुंज्या मनुष्यबळामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन व रुग्णसेवेचे कार्याचे अतिरिक्त ताण अध्यापकांवर येत आहे. याशिवाय आपल्या राज्यातील विविध जिल्हयाच्या मुख्यालया ठिकाणी नविन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले असून त्याकरिता या महाविद्यालयातील अध्यापक वर्ग तसेच तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त ब-याच वर्षापासून तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या भरत्या करण्यात आलेल्या नाहीत. वरील सर्व बाबींमुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य, महाविद्यालयाशी संलग्नीत रुग्णालयातील रुग्णसेवेचे कार्य तसेच इतर प्रशासकीय कार्य यांचा अतिरिक्त भार अतिशय तुटपुंज्या मनुष्यबळावर चालविला जात आहे. तसेच नजीकच्या भविष्यकाळात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांचे पदवीपूर्व (एम.बी. बी.एस) च्या १५० जागांकरिता आणि पदव्युत्तरच्या वाढीव जागांकरिता परीक्षण अपेक्षित आहे. अतिशय अपु-या मनुष्यबळामुळे येणा-या परीक्षणात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकानुसार गंभीर त्रुटी निर्माण होऊन महाविद्यालयातील वाढीव पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
                  नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यरत असून तेथील सर्व वैद्यकीय अधिका-यांच्या जागा पूर्णपणे भरलेल्या आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड या संस्थेचे वजिराबाद नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परीसरातील कार्यरत असलेले मुख्यालय इ.स. २०१५ रोजी पूर्णपणे स्थलांतरीत करुन विष्णुपुरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करुन येथे महाविद्यालय व रुग्णालय पूर्णपणे कार्यरत करण्यात आले व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा इमारतीसह ताबा जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या महाविद्यालयास विष्णुपुरी येथील नविन इमारतीत स्थलांतरीत होऊन ०७ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे ऐवढया काळात जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्णपणे कार्यरत होणे अपेक्षित होते परंतु जिल्हा सामान्य रुग्णलयाचे कार्य व तिथे देण्यात येणा-या वैद्यकीय सुविधा अतिशय तुटपुंज्या स्वरुपात पुरविल्या जातात. जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे आवश्यकतेनुसार गोरगरीब जनतेस सदरील रुग्णालयाच्या पूर्णक्षमतेने सुविधा पुरविल्या गेल्यास सर्वसामान्य गोरगरीब जनतेस नांदेड ते विष्णुपुरी ये-जा करण्याकरिता तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड या संस्थेतील कर्मचा-यांवर होणारा अतिरिक्त कामाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. पर्यायी इतर रुग्णालयातून संदर्भात करण्यात आलेले अत्यावस्थ रुग्ण व उच्चप्रतीच्या वैद्यकीय सेवांची आवश्यकता असणा-या रुग्णांना या महाविद्यालयामार्फत सुविधा पुरविणे अधिक सुयोग्य होईल.
                       दरम्यान, सर्व बाबींचा  गांभीर्याने विचार करून अध्यापकांचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकानुसार वाढीव पदनिर्मिती व पदभरती त्याचप्रमाणे तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची या महाविद्यालयात व रुग्णालयात रिक्त असलेली संपूर्ण पदांची पदभरती करण्यात यावी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड येथे संपूर्ण क्षमतेनुसार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधीतास आपल्या मार्फत देण्यात यावेत. जेणेकरून या महाविद्यालयातील वाढीव पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा कमी होण्याचा धोका राहणार नाही. तसेच गरजवंत व अत्यावस्थ गोरगरीब रुग्णांना या महाविद्यालयामर्फत दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविणे शक्य होईल अशी मागणी करण्यात आली आहे.  सदरील निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप बोडके व सचिव डॉ. मारोती डाके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेअर करा
Exit mobile version