Site icon सक्रिय न्यूज

पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसिलवर धडकणार भव्य मोर्चा……! 

केज दि.११ – बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली केज तालुका रिपाइंच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी दिली.
                     केज येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड हे बोलत होते. यावेळी मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, प्रभाकर चांदणे, शहराध्यक्ष भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, अविनाश जोगदंड, शाम वीर, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ यांची उपस्थिती होती.
                       यावेळी राजू जोगदंड म्हणाले की, या मोर्चाचे नियोजन रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले असून हा मोर्चा सन १९९० च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासनाच्या निर्णयाला २००५ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करण्यात यावे, विद्यार्थी पटसंख्येची अट रद्द करून संबधित शाळांवर शिक्षक नियुक्त करण्यात यावे, केज शहरातील क्रांती नगर, रमाई नगर येथील झोपडपट्टी वासीयांना कबाला पावत्या व पीटीआर देण्यात याव्यात, तालुक्यातील दलित बांधवांना स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात, राज्य शासनाकडून विविध कार्यालयात करण्यात येणारी कंत्राटी पद भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणार आहे. मंगळवार पेठ, बसस्थानक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version