केज दि.१२ – शहरातील मेन रोड वरील शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या नगर पंचायतच्या गाळ्यांमधील एका गॅरेजला आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. एवढेच नाही तर दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवलेले रोख पाच लाख रुपये जळून खाक झाले आहेत.
शासकीय विश्रामगृहाच्या समोर नाना गाढवे यांचे प्रीतम ऑटो गॅरेज आहे. रात्री नाना गाढवे हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. मात्र रात्री मध्ये अचानक सदरील गॅरेजला आग लागली आणि यामध्ये दुकानातील संपूर्ण सामान जळून खाक तर झालेच मात्र बँकेचे लोन भरण्यासाठी म्हणून गल्ल्यांमध्ये ठेवलेले पाच लाख रुपयेही जळून खाक झाल्याने गाढवे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
सदरील आग नेमकी कशाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून आजूबाजूच्या दुकानांना मात्र यामध्ये काही नुकसान झाले नाही. अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझवल्याने पुढील आर्थ टळला आहे.