माळेगाव दि.१६ – केज तालुक्यातील माळेगाव येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात रविवारी (दि १५ )विधीवत पूजा करून घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सवास ‘आई राजा उदोउदो …’ च्या गजरात भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीला तुळजापूरच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं ठाण मानले जाते.भाविक जगदंबा देवी या नावाने देखील ओळखतात.जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.भाविकभक्त नवस फेडण्यासाठी पायी चालत येत नवरात्र काळात दर्शनासाठी गर्दी करतात.मनोभावे पूजा आराधना करत असतात.मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आली आहे.
तुळजापूर येथे होत असलेल्या धार्मिक विधी परंपरेप्रमाणे येथे धार्मिकविधी पूजा केली जाते.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत असे पंधरा दिवस आराधी गाण्यासह विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम नवरात्र काळात आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रविवारी(दि २२) जोगवा मागणे, सोमवारी (दि 23)पहाटे होमहवन महाअभिषेक व घटोत्थापन आणि रात्री बलिदान होईल.मंगळवारी विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन होणार आहे.तर शनिवारी (दि२८)रोजी कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी यात्रा भरणार आहे.पहाटे अभिषेक महापुजा दुपारी २ वाजता गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे.आणि रात्री छबिना मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता होईल.