Site icon सक्रिय न्यूज

आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कार्यालयांना कुलूप ठोकू……!

केज दि.१९ – शहरातील कांही प्रलंबित मागण्यासाठी गुरुवारी केजडी नदीपुलावर तब्बल एक तास रस्ता रोको करण्यात आला. यावेळी केजडी नदी पुलाच्या दोन्ही बाजूला एक किमी अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एचपीएम कंपनी, राज्यपरिवहन महामंडळ व केज नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना तात्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र ज्या विभागांनी  समितीला प्रतिसाद व उत्तर दिले नाही त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा  केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे .
                    केज शहरात बस डेपो तात्काळ मंजूर करून त्याचे काम सुरू करा, केजच्या व्यापाऱ्यांना शासकीय योजने अंतर्गत पंच्यायत समितीने आपल्या जागेत बीओटी तत्वावर गाळे उपलब्ध करून द्यावेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे काम निविदा काढून तात्काळ सुरू करावे, केज शहरातील धारूर रोड व अंबेजोगाई – बीड रोडवरील  मुख्य महामार्गावरील पथदिवे तात्काळ सुरू करा, उमरी रस्ता महामार्गाच्या तोंडावर रुंद करा व बाजारदिवशी उमरी रस्त्यावर दुकाने व गाडे लावण्यास प्रतिबंध करा.
               तसेच शहरात डास निर्मूलन फवारणी करा, शहरात दोन्ही महामार्गावर बीड कडून येताना शिक्षक कॉलनी, धारूर कडून येताना भवानी मंदिर, अंबेजोगाई कडून येताना उपजिल्हा रुग्णालय व कळंब कडून येताना विठाईपुरम या चार ठीकाणी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत बस थांबा फलक तात्काळ लावावेत.                    दरम्यान, इतरही कांही प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करण्यासाठी गुरुवारी केज विकास संघर्ष समितीने सकाळी 11 वाजता केजडी नदी पुला वर जनतेच्या सहभागाने रस्ता रोको आंदोलन केले. ज्या कार्यालयांनी समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले त्यांच्या कार्यालयाला समितीने कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात हनुमंत भोसले, नासेर मुंडे,  शेषराव घोरपडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेअर करा
Exit mobile version