Site icon सक्रिय न्यूज

पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न…..!

पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न…..!

केज दि.२१ – मध्यप्रदेशातून गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आलेल्या टोळीचा सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पाठलाग केला. त्यांनी कार पोलिसांच्या अंगावर घालून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील पोलिसांनी मोठ्या शिताफीने चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुसासह ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार केज – मांजरसुंबा रस्त्यावरील बरड फाट्याजवळ घडला. चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायायलायने दिली आहे.
बीड शहरातील सनी शाम आठवले व त्याचा भाऊ अक्षय शाम आठवले हे दोघे संघटीत टोळी बनवून त्यांचे साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना अवैध व बेकायदेशिररित्या मध्यप्रदेश राज्यातून देशी बनावटीचे गावठी कट्टे आणून दहशत माजवतात. ते सदर कट्टे बीड जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात साक्षीदारांसह विक्री करीत असून ते मध्यप्रदेश येथुन काही गावठी कट्टे घेवुन बीड जिल्ह्यात विक्री करण्यासाठी आज कारने ( एम. एच. १६ बी. एच. ३१३६ ) छत्रपती संभाजीनगरकडुन बीडकडे येत आहेत. अशी गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी केज ठाण्याचे फौजदार राजेश पाटील, जमादार बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, भरत शेळके, होमगार्ड सारुक व आंधळे यांचे पथक २० ऑक्टोबर रोजी बीडकडे रवाना केले. या पथकाला दुपारी ४.३० वाजता सदरील कार ही गेवराईकडून बीडकडे येताना दिसून आली. तेथून पथकाने कारचा पाठलाग करीत मांजरसुंबा – केज रस्त्यावरील बरड फाट्याच्या पुढे त्यांच्या कारला ओव्हरटेक करून सायंकाळी ५.२५ वाजता पोलिसांनी त्यांचे वाहन आडवे लावून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलीस नाईक अनिल मंदे व भरत शेळके यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बाजूला उडी घेत जीव वाचविला. रेणुका पेट्रोलियमच्या लोखंडी पाटीस त्यांची कार घासून आडवी झाली. त्याचवेळी पोलिसांनी दुसरी गाडी आडवी लावून त्यांची कार थांबविली. कारमधून उतरून पळून जात असलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांनी हुज्जत व धक्काबुक्की करीत पळून जाण्याचा प्रयत्न ही केला.पोलिसांनी त्यांच्याकडून एक सिल्व्हर रंगाचा देशी बनावटीचा कट्टा, ५ जिवंत काडतुसे, चार मोबाईल व कार असा ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून अक्षय शामराव आठवले ( रा. माळीवेस चौक, सुभाष रोड, बीड ), संजेश सुरेशराव पाटेकर (जालना रोड, बीड ), वैभव मुकुंदराव कपाळे ( रा. धोडीपुरा, बीड ), कार चालक ओंकार अरुणराव पवार ( रा. माळीवेस, बीड ) या चौघांविरुद्ध केज पोलिसात कलम 307, 353, 186, 34, शस्त्र अधिनियम 25, 3 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आनंद शिंदे हे पुढील तपास करत आहेत. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शेअर करा
Exit mobile version