Site icon सक्रिय न्यूज

गंगा माऊली शुगरच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ….!

केज दि.26 – शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अर्थक्रांती आणणाऱ्या तालुक्यातील उमरी येथील गंगा माऊली शुगरच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ संत महंत व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

                तालुक्यातील उमरी अशोक नगर येथे असलेल्या गंगा माऊली शुगरचा द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी यावेळी प्रकाश महाराज बोधले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील ह्या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अशोकराव पाटील, उद्धव बापू आपेगावकर, गंगा माऊलीचे चेअरमन लक्ष्मण मोरे, युवानेते आदित्य पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे त्याचबरोबर हनुमंतराव मोरे, युवानेते किरण पाटील यांच्यासह अमित पाटील, गोविंद देशमुख, देविका पाटील, नवनाथ थोटे, पांडुरंग पाटील, बाबा लोमटे, एमडी मुजावर, श्री. ईखे, बाबाराजे देशमुख आदींची उपस्थिती होती.
                  कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, चेअरमन लक्ष्मण मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टर व बैलगाडीचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी गाडी मालक व गाडीवान यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विधिवत मोळी गव्हाणी मध्ये टाकून द्वितीय गाळपाचा शुभारंभ करण्यात आला.
               यावेळी बोलताना खासदार रजनीताई पाटील यांनी कारखान्यासाठी कारखान्यासाठी कित्येक वर्ष संघर्ष केला असल्याचे सांगितले. तसेच आता हा कारखाना योग्य व्यक्तीच्या हातात दिला असून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे बोनस जाहीर केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही अगदी अल्प दरामध्ये साखर वाटप करण्याच्या सूचनाही केल्या. तर माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी आमचं स्वप्न लक्ष्मणराव मोरे यांनी प्रत्यक्षात उतरवल्याने आम्ही समाधानी असल्याचे सांगितले. जनतेच्या प्रति असलेला विश्वास आम्ही कधीच कमी होऊ दिला नाही. त्यामुळे शेतकरी आमच्याबद्दल समाधानी असल्याचे बोलून दाखवले. हा कारखाना सर्वसामान्यांसाठी आहे. मात्र शेतकऱ्यांनीही कारखाना भरभराटीस येण्यासाठी साथ देण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. आणि त्याचबरोबर आपल्याच भागातल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे असा सल्लाही उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
                     यावेळी गंगा माऊलीचे कार्यकारी संचालक प्रवीण मोरे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी त्यांनी बोलताना कारखान्याने यावेळी केलेले संकल्प व मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलून दाखवले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मागच्या वर्षी शेतकी विभागामार्फत ज्याप्रमाणे मेळावे घेण्यात आले त्याच प्रकारे यावर्षीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर राहुल सोनवणे यांनी कारखान्याबद्दल बोलताना, गंगा माऊलीच्या माध्यमातून विचलित शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातल्यानंतर दुसऱ्या त्यादिवशी उसाचे पेमेंट करण्यात आल्याचेही सांगितले. सुदरील कारखान्याने मागच्या वर्षी उच्चांकी दर देऊन 85 टक्के साखर एक्सपोर्ट करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. तर गंगा माऊली शुगर हा कर्मचाऱ्यांच्या अडचणीत कायम पाठीशी उभा राहण्याचे काम करत असल्याचेही बोलून दाखवले. आणि यावर्षी सहा लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले. तर यावेळी यूपीएल सीड्स कंपनीचे पांडुरंग पाटील यांनी गोड ज्वारीबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. गोड ज्वारीचे उत्पन्न घेतल्यानंतर एकरी वीस ते पंचवीस टनाचे उत्पन्न हमखास निघते असा विश्वास दिला.त्याचबरोबर राजेसाहेब देशमुख यांनी चेअरमन लक्ष्मण मोरे यांच्यावर शेतकऱ्यांचा पांडुरंगा प्रमाणे विश्वास बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होणार असे मत व्यक्त केले. तर किरण पाटील यांनी यापुढे शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गंगामाऊलीने विश्वास दाखवल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आदित्य पाटील यांनी बोलताना मागच्या दोन वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान वापरून गंगा माऊली शुगर यशस्वी सुरू आहे. गंगा माऊली शुगर हा कसल्याही प्रकारचे गटतट न करता राजकारण विरहित शेतकऱ्यांचा विकास घडवून आणण्याचे काम करत असल्याचे बोलून दाखवले. तर राजेश्वर चव्हाण यांनी गंगा माऊली परिवाराने एक होम सुरू केला असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी गंगा माऊली शुगरचे लक्ष्मणराव मोरे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करताना यावर्षी कारखान्याची सर्व तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली असून सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे हास्य हाच आमचा नफा हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व त्याचे मागच्या वर्षीप्रमाणे वेळेवर पेमेंट करण्यात येणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. कर्मचाऱ्यांचा दरमहा वेळेवर पगार होईल, शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करू असेही बोलून दाखवले. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली उसाची दहा हजार ह्या वाणाची लागवड करावी असे आवाहन केले. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कच्चा ऊस कारखान्याला देऊ नये किमान ऊस हा बारा महिन्याचा असावा त्यातून उत्पन्नही जास्त मिळते असे सांगितले. त्याचबरोबर यावर्षी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याचेही जाहीर केले.
              यावेळी मागच्या वर्षी सर्वात जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रकाश महाराज बोधले यांनी आशीर्वाद दिले. तसेच ख्यातनाम कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे दुःखद निधन झाल्याने कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना श्रद्धांजली वाहिली व कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचलन प्रा.हनुमंत सौदागर यांनी केले.

कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड…..!

दुसऱ्याच वर्षी गंगा माऊली चे चेअरमन लक्ष्मण मोरे यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक गोड निर्णय जाहीर केला. अहोरात्र मेहनत करणाऱ्या गंगा माऊली च्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या पगारा एवढी रक्कम दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी दिवाळी गोड होणार म्हणून चेअरमन मोरे यांचा भव्य सत्कारही केला.तसेच उसाला भावही जास्त देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकरीही आनंदी दिसत होते.

शेअर करा
Exit mobile version