केज दि.२८ – केज बसस्थानका बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून पुन्हा प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
कळंब तालुक्यातील इटकुर येथील एक महिला सासुसह दि.२८ रोजी दुपारी नेकनूरला देवदर्शनासाठी जाण्यासाठी केजच्या बसस्थानकात आली होती.सदर महिला उदगीर – संभाजीनगर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दिड तोळ्याचे गंठन चोरून पोबारा केला. सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसचे वाहक व चालक यांना कल्पना दिली. त्यामुळे सदरील बस पोलीस ठाण्यात आणून बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली मात्र गंठण सापडले नाही.त्यामुळे सोने घेऊन कुणीतरी बसस्थानकातूनच पसार झाले असावे.
मागच्या कांही महिन्यांपूर्वीही असे प्रकार वारंवार घडल्याने बसस्थानकात पोलीस चौकी उभारण्याची मागणी झाल्याने पोलीस चौकी सुरूही केली. परंतु सदरील चौकी नेहमीच बंद राहत असल्याने चौकी म्हणजे ”असून अडचण नसून खोळंबा” झाली आहे. बसस्थानकात अशा घटना घडल्यानंतर वेळेवर मदत मिळत नसेल तर काय उपयोग ? असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे सदरील चौकीत कायम एक पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे.