केज दि.३० – मुख्य पाईपलाईन वरच महावितरण ने पोल रोवल्यामुळे पाईपलाईन फुटली होती. आणि आता तो पोल काढून दुसरीकडे रोवण्यासाठी किमान तीन-चार दिवस लागतील अशी शंका निर्माण झाली होती. परंतु केज महावितरण ने तत्परता दाखवत अगदी दुसऱ्याच दिवशी पोल दुसरीकडे रोवून पाईपलाईन ची जागा मोकळी केल्याने पाण्याचा जो प्रश्न निर्माण होणार होता तो आता होण्याची शक्यता कमी आहे. मात्र यासाठी नगरपंचायत नेता तत्परता दाखवत फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे.
केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस एका अज्ञात वाहनाने मुख्य विद्युत वाहिनीच्या पोलला धडक दिली. त्यामुळे तीन पोल क्षतीग्रस्त झाले होते. त्यापैकी दोन पोल नवीन उभारण्यात आले आणि तिसरा दुरुस्त करण्यात आला. मात्र एक पोल जो रोवल होता तो ऐन मुख्य पाईपलाईनच्या वरच रोवल्याने पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे अगदी पोल ज्या ठिकाणी रोवला त्या ठिकाणाहूनच मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊ लागले होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता तो पोल काढून दुसरा रोवायचा यासाठी किमान तीन-चार दिवस महावितरण घेईल असे वाटले होते. परंतु महावितरणने तत्परता दाखवत दुसऱ्याच दिवशी तो पोल दुसऱ्या बाजूला रोवल्याने आता पाईपलाईन दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, महावितरण प्रमाणेच नगरपंचायतने तत्परता दाखवून तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करण्याची गरज आहे. पाहूयात नगरपंचायत कितपत तत्परता दाखवतेय….!