केज दि.८ – येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांना लुटण्याचे सत्र थांबता थांबत नाही. मागच्या कित्येक दिवसांपासून केज बसस्थानकामध्ये अनेक प्रवाशांना लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांना टार्गेट केल्या जाते आणि त्यांच्या गळ्यातील, पर्स मधील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला जातो. मात्र अद्याप चोरांवर कसल्याही प्रकारचा वचक बसला नसून चोरीचे सत्र सुरूच आहे.
केस बस स्थानकामध्ये बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास मेहकर पंढरपूर गाडीमध्ये दोन मुली बसल्या.मात्र गाडी बस स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर एका मुलीला आपली पर्स चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदरील मुलगी रडू लागल्याने चालक व वाहकाने ती बस थेट केज पोलीस स्थानकामध्ये आणली आणि त्या ठिकाणी बस मधील सर्वच प्रवाशांची झाडाझडती घेतली.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वीही कळंब तालुक्यातील एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. त्याचा तपास सुरू असतानाच पुन्हा ही घटना घडल्याने केज बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनामध्ये कायम भीतीचे वातावरण आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केज बस स्थानकामध्ये पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेले आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून ते बंद आहे. त्यामुळे केज बस स्थानकामध्ये चोरी करणाऱ्यांचे मनोबल वाढलेले असून अशा वारंवार घटना घडत आहेत. दरम्यान चोरी करून चोरटे पसार होतात आणि सामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. बस पोलीस ठाण्यात आल्यानंतर सर्वच प्रवाशांची झाडाझडती घेतल्या जाते.त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशी एकमेकांकडे संशयास्पद नजरेने पाहतात. केज बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेज मधूनही काही धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलीस ही हतबल झालेले आहेत की काय ? असे वाटू लागले आहे.आणि आता दिवाळी सणाचे दिवस असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत. त्यामुळे किमान आता तरी पोलीस मदत केंद्राचे शटर उघडावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.