केज दि.९ – मागच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उमरी रस्त्याचे काम अर्धे नगरपंचायत च्या माध्यमातून पूर्ण झाले. आणि पुढचा टप्पा हा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत आहे.मात्र सध्याचे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होते की काय ? अशी शंका उमरी रोडवरील रहिवाशांना भेडसावत आहे.
अहिल्यादेवी नगर, समता नगर, गणेश नगर, सहयोग नगर, द्वारका नगरी या सर्व वसाहतीतून पुढे जाणारा रस्ता केज सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेल्या कामाचे उद्घाटन मागच्या दोन महिन्यापूर्वी झाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली. दोन्ही बाजूने नाल्यांचे काम पूर्ण झाले असून आता रस्ता खोदून पुढील काम करण्यात येत आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू असतानाच ज्या ठिकाणावरून अंतर्गत गल्ल्यांमध्ये रस्ते जातात त्या ठिकाणी नाल्यांवर जो काही स्लॅब टाकलेला आहे तो अवघ्या पंधरा दिवसाच्या आत ढासळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणाहून अंतर्गत गल्लीमध्ये जाणे अवघड झाले आहे. अतिशय नावाजलेल्या गुत्तेदाराकडून संबंधित काम होत असल्याचे सांगितल्या जात असून कामही वेगाने होणार असे बोलल्या जात आहे. परंतु नामांकित गुत्तेदार अशा प्रकारचे पंधरा दिवसातच ढासळणारे आणि आपला दर्जा दाखवणारे काम करत असेल तर ते काम न झालेले बरे असेही रहिवासी बोलू लागले आहेत. दोन्ही बाजूने नाली बांधकाम झाल्यानंतर ज्या प्रमाणामध्ये वॉटरिंग करणे गरजेचे आहे ती न केल्याने व योग्य जाडीही न घेतल्याने असे प्रश्न अगदी पंधरा दिवसातच उद्भवू लागलेले आहेत.
दरम्यान मागच्या कित्येक वर्षांच्या वनवासानंतर उमरी रोड लगतच्या रहिवाशांना रस्ता होत असल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र काम सुमार आणि दर्जाहीन होत असल्याचे निदर्शनात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज असून संबंधित गुत्तेदाराला गुणवत्ता पूर्ण काम करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. अन्यथा उमरी रोडवरील रहिवासी अशा प्रकारचे दर्जाहीन काम बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत.