Site icon सक्रिय न्यूज

केज पंचायत समितीच्या बेवारस कॉर्टर्स हस्तांतरित करता येत नसतील तर संरक्षण तरी द्या…..!

केज पंचायत समितीच्या बेवारस कॉर्टर्स हस्तांतरित करता येत नसतील तर संरक्षण तरी द्या…..!

केज दि.११- मागच्या तीन ते चार वर्षांपूर्वी केज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्यापही त्या हस्तांतरित न झाल्याने सदरील सदनिका बेवारस अवस्थेत पडल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्याच प्रकारचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे त्याठिकाणी “रात्रीस खेळ चाले” अशी अवस्था दिसून येत आहे.                              केज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या सदनिका ह्या मोडकळीस आलेल्या होत्या. त्यामुळे जुन्या सदनिका पाडून नवीन बांधण्यात आल्या.सदरील सदनिका बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झालेला आहे. अगदी रंगरंगोटीपर्यंत आलेल्या सदनिका अद्यापही बेवारस अवस्थेत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांसाठी या सदनिका बांधण्यात आल्या त्यांना अद्यापही हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्यामुळे सदरील सदनिकेच्या आडोशाला मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळेस अनेक टोळके त्या ठिकाणी जमा होतात आणि नको नको ते धंदे करू लागलेले आहेत. काही जण तर चक्क त्या सदनिकेच्या आडोशाला बसून मद्यपान सुद्धा करताना चे चित्र दिसून येते. रंगरंगोटीपर्यंत आलेल्या सदनिकेचे खिडक्यांचे काच पूर्णतः फोडल्या गेल्या असून परिसरामध्ये आणि सदनिकेमध्ये अगदी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक जण त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस येऊन बसतात आणि त्याच ठिकाणी धूम्रपान असेल किंवा गुटखे खाऊन थुंकत असल्याने संपूर्ण भिंती आणि परिसर लालीलाल झालेला आहे. त्यामुळे करोडो रुपये हे वाया गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

             दरम्यान, नेमका प्रशासनाला सदनिका हस्तांतरित करण्यासाठी कोणता अडथळा आहे ? हे मात्र अद्याप समजलेले नाही. दोनदोन, तीनतीन मजली सदनिका बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा राहण्यासाठी जर उपयोग होत नसेल तर एवढे करोडो रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय होती ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कांही काम अर्धवट राहिलेले असेल तर किमान पूर्ण होईपर्यंत त्या सदनिकांचे संरक्षण करण्याची आवश्यकता असून लवकरात लवकर हस्तांतरण होणे गरजेचे आहे.मात्र त्याकडे पंचायत समितीच्या प्रमुखांचे अजिबात लक्ष नाही. आणि अशीच अवस्था आणखी कांही दिवस राहिली तर सदनिकांचे खंडर व्हायला वेळ लागणार नाही.सदरील प्रश्नी उपअभियंता श्री.भिसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही.
शेअर करा
Exit mobile version