बीड दि.१५ – जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्व ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी समाज एकवटत असून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज अंबड ला जाण्याच्या तयारीत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केज तालुक्यातही यलगार सभेच्या तयारीसाठी ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. तर कानडी माळी या एकाच गावातून येथून तब्बल 100 गाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड (धाईत नगर, अंबड – पाचोड रोड) येथे ओबीसी आरक्षण एल्गार सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. सदरील एल्गार सभेसाठी ओबीसी चे नेते, समता परिषेदेचे संस्थापक तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजीमंत्री जयदत्त क्षिरसागर, माजी मंत्री पंकजा मुंडे त्याच बरोबर रासपचे महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. एल्गार सभेला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज बांधव तयारीला लागलेला आहे. केज तालुक्यातील गावागावात ओबीसी समाज बैठका घेऊन अंबड येथे एल्गार सभेला जाण्याचे नियोजन करत आहे. आणि त्याच अनुषंगाने केज तालुक्यातील कानडी माळी येथेही नियोजन बैठक संपन्न झाली यामध्ये अंबड येथे जाण्यासाठी एकाच गावातून 100 गाड्यांचे नियोजन ग्रामस्थांनी केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील गावागावात बैठका घेण्यात येत असून एल्गार सभेसाठी बहुसंख्य ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.