Site icon सक्रिय न्यूज

उमरी रस्ता कामाचा ना कुठे अंदाजपत्रकाचा फलक ना कुठे समानता…..!

केज दि.१५ – मागच्या दोन महिन्यांपासून केज शहरांमध्ये रस्ते विकास प्रकल्पांतर्गत सुमारे 76 कोटी रुपयांचे रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये सुमारे 15 कोटी रुपये खर्च असलेल्या उमरी रस्त्याचेही काम सुरू आहे. मात्र काम सुरू झाल्यापासूनच यामध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येऊ लागलेल्या आहेत. आणि रस्त्याच्या कामामध्येही ठिकठिकाणी अनियमितता दिसून येत आहे.

                  शहरातील सर्वात मोठ्या रस्त्यांपैकी एक असलेला उमरी रस्ता मागच्या पंचवीस वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र मागच्या दोन महिन्यांपूर्वी रस्ते विकास प्रकल्पांतर्गत सदरील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 98 लाख रुपयांचे काम झाले आणि त्यानंतर सुमारे 15 कोटी रुपयांचे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मात्र यामध्ये नागरिक संभ्रमात आहेत. संभ्रम यासाठी आहे की नेमका रस्ता किती फूट रुंदीचा आहे ? किती लांबीचा आहे ? हे मात्र नागरिकांच्या लक्षात येत नसल्याने व तशा प्रकारचा कसल्याही प्रकारचा कामाच्या अंदाजपत्रकाचा कुठेच बोर्ड न लावल्याने (फलक लावणे बंधनकारक असतानाही) सदरील प्रभागातील रहिवाशी अंधारात आहेत. सदरील रस्ता हा जुना 33 फुटाचा आहे असं म्हटल्या जातं. मात्र त्यानंतर एक नकाशा सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्यामध्ये उमरी रस्ता हा 18 मीटरचा दिसून येत आहे. रुंदी डीपी प्लॅनच्या नकाशामध्ये 18 मीटर आणि काम होतेय वेगळेच. त्यामुळे सदरील रस्त्याचा घोळात घोळच आहे. काही ठिकाणी सदरील रस्त्याचे काम कुठे 26 फुट, कुठे 28 फुटाचे आहे तर कुठे तीस फुट रुंदीचे होत आहे. त्यामुळे नेमका रस्ता किती फुटाचा होतोय याबद्दल नागरिक संभ्रमात आहेत. आणि हेच सर्व प्रश्न नागरिकांच्या मनातून काढण्यासाठी प्रशासनाने समोर येऊन सदरील रस्त्यासंबंधी जे काही अंदाजपत्रक आहे ते मांडले पाहिजे आणि त्यानुसार संबंधित प्रभागातील नागरिकांना अवगत केले पाहिजे.
            दरम्यान, मागच्या दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. मात्र अनेक ठिकाणी नाली कोसळली आहे. पाहिजे तेवढी वॉटरिंग न झाल्याने असे प्रकार झालेले आहेत असे नागरिक आता समोर येऊन सांगू लागलेले आहेत. आणि असे जर काम पूर्ण होण्याच्या अगोदरच नाली बांधकाम जर ढासळत असेल तर ते नंतर किती दिवस टिकेल ? हा एक मोठा प्रश्न आहे. सदरील काम हे रस्ते विकास प्रकल्पांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत आहे. त्यामुळे काम कसे होत आहे ? किती होत आहे ? दर्जेदार होते की नाही ? हे सर्व पाहण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत हा रस्ता येतो त्यामुळे त्यांनीही आपला एखादा अधिकृत अभियंता या कामावर नेमणे गरजेचे आहे. आणि नेमला असेल तर तो कधीही आणि कुठेही दिसून येत नाही. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे काही सुपरविजन करणारे अधिकारी आहेत त्यांनीही काम सुरू असताना किमान दोन दिवसाला तरी कामावर फिरकावे अशी अपेक्षा आहे.
शेअर करा
Exit mobile version