केज दि. 20 – सरासरी दर आठवड्याला केज बस स्थानकामध्ये चोरीची घटना घडत आहे. कित्येक दिवसांपासून या चोरीच्या घटना घडत आहेत, चोरट्यांमध्ये कसल्याही प्रकारची पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सोमवारीही एका महिलेचे पाच लाख रुपयांचे दागिने हातोहात पसार केल्याची घटना घडली आहे.
केज शहर हे सुमारे दीडशे खेड्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. या बस स्थानकातून शेकडो गाड्या ये जा करतात. हजारो नागरिक विविध ठिकाणी प्रवासाला जाण्यासाठी केज बस स्थानकामध्ये येतात आणि याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी केज बस स्थानक आपला अड्डा बनवले आहे. या बस स्थानकातून बसमध्ये चढताना आणि उतरताना महिलांच्या गळ्यातील, पर्समधील दागिन्यांवर डोळा ठेवून चोरटे ते हातोहात लांबवत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून असे हे चोरीचे प्रकार सुरू आहेत मात्र ते बंद होताना दिसत नाहीत. सातत्याने चोरीच्या घटना घडू लागल्याने केज बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणी करण्यात आल्यानंतर पोलीस मदत केंद्र त्या ठिकाणी उभारण्यात आले. सुरुवातीला त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केलीही मात्र पुन्हा सदरील पोलीस मदत केंद्र सतत बंद राहू लागले. त्यामुळेही चोरटे बिनधास्त झाले आणि मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वीच महिलांचे दागिने चोरण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. आणि त्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा कळंब तालुक्यातील एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत. त्यामुळे केज बस स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांत अगदी दहशत निर्माण झाली असून कधी आपले सामान, पैसे, दागिने लांबवल्या जातील याची भीती मनामध्ये आहे.
दरम्यान सातत्याने ह्या होणाऱ्या घटना आणि त्यामध्ये असणारे चोरटे याचा थांग पत्ता का लागत नाही? नेमकी एखादी टोळी सक्रिय आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत. अन्यथा प्रवाशांना नाहक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.